वार्ताहर /हरमल
खालचावाडा भागात धुवांधार पाऊस व वादळी वाऱ्याने दोन घरांवर झाडे कोसळून सुमारे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कुणाला दुखापत झालेली नाही. मंगळवारी दि. 25 रोजी स. 10 वा. खालचा वाडा येथील इलियास रॉड्रिगिस यांच्या घरांवर भले मोठे भेंडीचे झाड पडून 20 हजार रुपयांचे नुकसान झाले. दुसऱ्या एका घटनेत, रोझिता फर्नांडिस यांच्या घराच्या ओटीवर समोरच असलेले झाड कोसळून सुमारे 20 हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यांच्या घरासमोरील जंगली झाड पडून नुकसान झाले. सदर झाडे कोसळण्याच्या प्रसंगी घरात कोणी नव्हते त्यामुळे कुणाला दुखापत झाली नाही. दरम्यान सरपंच बर्नार्ड फर्नांडिस यांनी नुकसानग्रस्त घरांची पाहणी करून घरमालकांना धीर दिला व मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.









