अनेकजण तीन दिवस घरातच आहेत अडकून : खाण्याजेवणाच्या वस्तू संपण्याच्या मार्गावर.काम, बाजारहाटीसाठी बाहेर पडणे मुश्किल
वार्ताहर /दाभाळ
उण्णय नदीची पातळी वाढल्याने निरंकाल व दाभाळ गावांना जोडणारा मुख्य रस्ता पुन्हा पाण्याखाली गेला आहे. सलग दोन दिवस हा मार्ग बंद होता. सोमवारी पाणी ओसरल्याने या भागातील लोकांना किंचित दिलासा मिळाला होता. वाहतूकही सुऊ झाली होती. मात्र मंगळवारी पुन्हा पाणी वाढल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला. तसेच जवळपासच्या काही लोकवस्तींमधील लोक घरातच अडकून पडले आहेत.
पेण्यामळ, माट्टीधाड, तारीभाट वाड्यांवरील लोक घरात अडकले
दाभाळ पूल पार केल्यानंतर अवघ्या दोन मिनिटात निरंकालहून दाभाळकडे पोचता येते. हा मार्ग बंद झाल्याने सध्या धारबांदोडा किंवा पाज, बिंबळ, वागोणमार्गे पर्यायी रस्त्याने मोठा वळसा घालावा लागत आहे. पुरामुळे रस्ते पाण्याखाली गेल्याने निरंकाल भागातील पेण्यामळ, माट्टीधाड, तारीभाट या वाड्यांवरील लोकांचे पुष्कळ हाल सुऊ आहेत. पेण्यामळ लोकवस्तीकडील मुख्य रस्ता गेले तीन दिवस पाण्याखाली गेल्याने वाड्यावरील लोक घरातच अडकून पडले आहेत. रस्ता बंद झाल्याने वाहन घेऊन कामावर किंवा बाजारहाटीसाठी घरातून बाहेर पडणे अवघड बनले आहे. काही कुटुंबातील लोकांच्या खाण्याजेवणाच्या वस्तू संपत आल्याने त्यांच्यावर बिकट परिस्थिती ओढवली आहे. रोजंदारीवर कामाला जाणारे लोक आपल्या घरीच अडकून पडल्याने पैसे कुठून आणावेत ही चिंता त्यांना सतावू लागली आहे. पूरस्थिती अजून काही दिवस अशीच राहिल्यास येथील लोकांचे जगणे कठीण होऊन बसणार आहे. सध्या या लोकवस्तींमध्ये मदतकार्य पोचण्याची गरज आहे. राज्य सरकार प्रशासन तुमच्या दारी ही संकल्पना राबवित आहे. मात्र सध्या त्याची खरी गरज या भागातील लोकांना आहे. पेण्यामळ, तारीभाट, माट्टीधाड भागातील लोकवस्तीमध्ये प्रत्येक घरात सध्या प्रशासन पोचणे गरजेचे आहे, असे येथील रहिवासी गिरीश तेंडुलकर यांनी सांगितले. उण्णय नदीला दर पावसाळ्यात पूर येऊन येथील मुख्य रस्ता व आसपासच्या लोकवस्तीपर्यंत पाणी पोचते. त्यावर कायमस्वऊपी उपाययोजना करण्याची मागणी संकटात सापडलेले ग्रामस्थ करीत आहेत.









