मृतांमध्ये 10 सैनिकांचा समावेश
वृत्तसंस्था/ अल्जीयर्स
अल्जीरियाच्या जंगलांमध्ये लागलेल्या आगीने उग्र रुप धारण केले असून या आपत्तीत आतापर्यंत 25 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर बळींमध्ये 10 सैनिकांचा समावेश आहे. हे सैनिक जोरदार वारे अन् उष्णतेदरम्यान आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत होते. 1,500 लोकांना जंगलातून बाहेर काढण्यात आले आहे. राजधानी अल्जीयर्सच्या पूर्व दिशेला असलेल्या बेनी क्सिलाच्या रिसॉर्ट क्षेत्रात आग विझविताना 10 सैनिकांना जीव गमवावा लागला असून 25 जण जखमी झाल्याची घोषणा संरक्षण मंत्रालयाने केली आहे.
जंगलातील आग जोरदार वाऱ्यांमुळे आता कृषिक्षेत्रांमध्ये फैलावली आहे. वणव्याची सर्वाधिक तीव्रता बेजिया अन् जिजेल क्षेत्रात दिसून येत आहे. अल्जीयर्सपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावरील बौइरा या क्षेत्राचे या वणव्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 7,500 अग्निशनम दलाचे कर्मचारी अन् 350 वाहनांसह वायूदल देखील कार्यरत असल्याची माहिती तेथील गृह मंत्रालयाने दिली आहे.









