बुकिंग न झाल्याने लोकांना त्रास : तिकीट कॅन्सिलेशनसाठी रेल्वेकडून नंबर जारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसीची वेबसाइट अन् अॅप डाउन झाले आहेत. लोकांना मंगळवारी सकाळी तिकीट बुकिंग करता येत नव्हते. तांत्रिक कारणांमुळे तिकिटिंग सेवा उपलब्ध नसल्याचे आयआरसीटीसीने ट्विट करत म्हटले आहे.
आमचे तांत्रिक पथक ही समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तांत्रिक समस्या दूर होताच आमच्याकडून कळविले जाईल असे आयआरसीटीसीकडून म्हटले गेले आहे. याचबरोबर आयआरसीटीसीकडून तिकीट कॅन्सिलेशनसाठी एक क्रमांक जारी करण्यात आला आहे. सद्यस्थितीत अन्य प्लॅटफॉर्म्सद्वारे तिकीट बुकिंग केले जाऊ शकते असे सांगण्यात आले.
आयआरसीटीसीची वेबसाइट ही ‘तत्काल’ बुकिंगसाठी राखीव असणाऱ्या वेळेत डाउन झाली आहे. एसी क्लाससाठी ‘तत्काल’ बुकिंग सकाळी 10 वाजल्यापासून तर नॉन-एसी क्लाससाठी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होते.
अनेक युजर्सनी एरर मेसेजचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिकीट बुक करण्याच्या प्रयत्नात 5 वेळा पैसे कापले गेले, तरीही तिकीट एकदाही बुक झाले नसल्याची तक्रार एका युजरने केली आहे.
आयआरसीटीसीच्या 2021-22 च्या अहवालानुसार आयआरसीटीसीद्वारे प्रतिदिन 11.44 लाख तिकिटांचे बुकिंग केले जाते. वर्षात 41 कोटीहून अधिक तिकीट आयआरसीटीसीची वेबसाइट आणि अॅपद्वारे बुक करण्यात आले आहेत. तर आयआरसीटीसी पोर्टलवर 5 कोटीहून अधिक लोक नोंदणीकृत आहेत.









