वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सची कंपनी म्हणून मारुती सुझुकीला ओळखले जाते. मात्र सध्या मारुतीच्या काही वाहनांमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्या दुरुस्त करुन देण्यासाठी कंपनीने आपल्या 87,599 युनिट्स परत मागवल्या आहेत.
या संदर्भात, मारुती सुझुकीने शेअर बाजाराला माहिती दिली की त्यांना 5 जुलै 2021 ते 15 फेब्रुवारी 2023 दरम्यान निर्मित मारुती एस प्रेसो आणि इको कारमध्ये दोष असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या वाहनांमध्ये स्टियरिंग रॉडमध्ये दोष असल्याच्या तक्रारी येत होत्या. या तक्रारींनंतर कंपनीने या युनिट्स परत मागवण्यास सुरुवात केली आहे.
स्टियरिंग रॉडबाबत दोष
दोषयुक्त मारुतीच्या 87599 गाड्या परत मागवल्या जात आहेत. ऑटोमोबाईल कंपनीने सांगितले की, या वाहनांमध्ये वापरण्यात आलेल्या स्टियरिंग टाय रॉडचा काही भाग सदोष असल्याचा संशय आहे. जे लवकरच दुरुस्त केले जाईल. ज्या वाहनांच्या तक्रारी येत आहेत, त्या वाहनांची तातडीने दुरुस्ती करण्यात येत असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
दोन्ही कार परत मागविणार
कंपनी मारुती ए-प्रेसो आणि इकोमधील सदोष यंत्रणा मोफत बदलणार आहे. जर तुमच्याकडेही या कार असतील तर तुम्ही अधिकृत वर्कशॉप कस्टमर केअरशी संपर्क साधू शकता, असे कंपनीने सांगितले आहे.
कंपनी या कार्सची तपासणी आणि आवश्यक ती दुरुस्ती मोफत करेल. हे काही पहिले प्रकरण नाही. मारुती सुझुकीने या वर्षात 3 वेळा आपल्या गाड्या परत मागवल्या आहेत. जानेवारीमध्ये कंपनीने 17362 वाहने परत मागवली होती तर एप्रिलमध्ये 7213 वाहने परत मागवली होती.