विकास आढावा बैठकीत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची अधिकाऱ्यांना सूचना : निवारा केंद्रे–चारा छावण्या सुरू करण्याचा आदेश
बेळगाव : जिल्ह्यात संततधार सुरू असूनही काही ठिकाणी दुष्काळाची छाया आहे. त्यामुळे गरजेनुसार निवारा केंद्रे सुरू करावीत, चाऱ्याची कमतरता असेल तर अशा ठिकाणी चारा छावण्या सुरू कराव्यात. त्याचबरोबर अन्नभाग्य व गृहलक्ष्मी आदी सरकारी योजनांची योग्यरितीने अंमलबजावणी करावी, अशा सूचना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना केल्या. सोमवारी सुवर्णविधानसौधमधील सभागृहात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटक विकास आढावा बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या कामांचा आढावा घेतला. यावेळी महिला व बाल कल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित होत्या. 2019-20 मधील पूर व अतिवृष्टीमुळे बेघर झालेल्यांना भरपाई देता यावी, यासाठी त्वरित पुनर्सर्वेक्षण करून त्याचा अहवाल राजीव गांधी वसती निगमला पाठवावा. शेतवडीत जाण्यासाठी मनरेगा योजनेतून पाणंद रस्त्यांची बांधणी करण्यासंबंधी क्रिया योजना तयार करावी. अथणी परिसरातील द्राक्ष उत्पादकांची बैठक घेऊन पीकविमा योजनेसंबंधी त्यांना माहिती द्यावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.
जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती आहे. याकडे आमदारांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधताच गोशाळा सुरू करण्याची सूचना दिली. जिल्हाधिकारी व जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अशा ठिकाणी स्वत: भेट देऊन आवश्यक कार्यवाही करावी, असे अधिकाऱ्यांना सूचित केले. रस्ते दुरुस्तीसाठी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी केबल घालण्यासाठी खोदाई करण्यात येत असून हे त्वरित थांबवावे. परवानगीशिवाय खोदाई करण्याच्या प्रकारावर आळा घालावा. नियमानुसार रक्कम भरून यासाठी अनुमती घ्यावी. नहून अशी कामे अडविण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. इस्लामपूरसह विविध ग्राम पंचायतींमध्ये झालेल्या गैरव्यवहारांसंबंधी तक्रार दाखल करून कडक कारवाई करावी, अशी सूचना जिल्हा पंचायतीच्या अधिकाऱ्यांना देतानाच अन्नभाग्य योजनेंतर्गत सर्व लाभार्थींच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचा आदेश त्यांनी दिला.
गृहलक्ष्मीसाठी 17 हजार कोटी
गृहलक्ष्मी योजनेसाठी 17 हजार कोटी रुपयांचे अनुदान पुरविण्यात आले आहे. 20 जुलैपासून नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. लाभार्थींची संख्या व नोंदणी प्रक्रियेविषयी तहसीलदारांनी स्थानिक आमदारांना माहिती द्यावी, अशी सूचना लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली. यावेळी आमदार महांतेश कौजलगी, आमदार राजू सेठ, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, हणमंत निराणी, चन्नराज हट्टीहोळी, डॉ. साबण्णा तळवार, आमदार दुर्योधन ऐहोळे, बाबासाहेब पाटील, विठ्ठल हलगेकर, महेंद्र तम्मण्णावर, विश्वास वैद्य, निखिल कत्ती, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, पोलीस उपायुक्त शेखर एच. टी. आदींसह जिल्ह्यातील अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
नवीन जिल्हाधिकारी कार्यालय उभारणार
बेळगाव येथे नवे जिल्हाधिकारी कार्यालय उभारण्यासंबंधी बैठकीत माहिती देऊन पालकमंत्र्यांनी त्याची रुपरेषा सांगितली. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात 9 एकर जागा उपलब्ध आहे. यापैकी 2 एकर जागेत कार्यालय उभारण्याचे उद्दिष्ट आहे. उर्वरित जागेत पार्किंग, उद्यान व इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेसंबंधी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी आपल्या सूचना, सल्ला देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
दिव्यांगांसाठी दुचाकी वाटपाचा निर्णय
राज्यातील दिव्यांगांना गरजेनुसार दुचाकी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पात्र लाभार्थींची माहिती जमा करावी, अशी सूचना महिला व बाल कल्याण, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक सबलीकरण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली. हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे वीजतारेच्या स्पर्शाने मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना त्वरित भरपाई द्यावी. भाडोत्री इमारतीत अंगणवाड्यांच्या बदल्यात स्वत:ची इमारत उभारण्यास प्राधान्य द्यावे, शाळा आवारातच अंगणवाडीची इमारत उभारल्यास पुढे मुलांना प्रवेश घेणेही सुलभ होणार आहे, असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
सरकार पाडविण्यात भाजप तरबेज : पालकमंत्री सतीश जारकीहोळींचा टोला
भाजप नेते सरकार पाडविण्याची रणनीती आखत आहे. ही बाब खरीही असेल नसेलही, याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार पाहतील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगून भाजप नेते लोकनियुक्त सरकार पाडविण्यात परिणीत आहेत, असा टोलाही मारला. सुवर्णविधानसौध येथे विकासकामांचा आढावा घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. भाजपकडून सरकार पाडविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याच्या विषयावर ते बोलत होते. भाजपकडून देशभरात लोकांकडून निवडून देण्यात आलेली सरकारे पाडण्यात आली आहेत. यामध्येच ते तरबेज आहेत, असा टोला मारून अनेक राज्यांमध्ये त्यांच्याकडून सरकारे पाडविण्यात आली आहेत. त्यामुळे आपल्यालाही हुशारीने राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.









