मोफत बसप्रवासाचा मॅक्सीकॅब चालकांना जबर फटका
बेळगाव : राज्यात महिलांना मोफत बसप्रवास करता यावा, यासाठी सरकारने शक्ती योजना सुरू केली. परंतु, या योजनेचा मॅक्सीकॅब व्यवसायाला जबर फटका बसला आहे. मोफत प्रवासामुळे मॅक्सीकॅब, टेम्पो ट्रॅव्हलर, टमटम यांचा व्यवसाय पूर्णपणे थंडावला आहे. यामुळे बँकेचे कर्जाचे हप्ते कसे भरायचे? असा प्रश्न मॅक्सीकॅब चालकांसमोर आहे. रज्यातील काँग्रेस सरकारने 11 जूनपासून शक्ती योजनेची अंमलबजावणी सुरू केली. या योजनेद्वारे महिलांना राज्यांतर्गत कोठेही मोफत बसप्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. योजना सुरू होऊन महिनाभराचा कालावधी लोटला असून याचा फटका मॅक्सीकॅब व्यवसायाला बसला आहे. महिला प्रवाशांची संख्या झपाट्याने कमी झाल्याने बऱ्याच वाहनचालकांनी आपली वाहने विक्रीस काढली आहेत. वाहनाच्या देखभालीसाठी लागणारी रक्कमही भाड्यामधून वसूल होत नसल्याने इतर व्यवसाय केलेला बरा, असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. वाहनांचे मालक, चालक व मदतनीस अशी एकूण दोन हजार कुटुंबे बेळगावमध्ये या व्यवसायावर अवलंबून आहेत. काही जणांनी तर भाडेतत्त्वावर मालकांकडून वाहने चालविण्यास घेतली आहेत. परंतु, शक्ती योजनेमुळे भाडेच मिळत नसल्यामुळे वाहनचालक अडचणीत सापडले आहेत. वाहने घेताना बँकेकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे? हाही प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
महिलांकडून बसनेच प्रवास
बेळगाव परिसरामध्ये 700 हून अधिक मॅक्सीकॅब व टेम्पो ट्रॅव्हलर आहेत. बेळगावमधून तालुक्याच्या विविध गावांमध्ये त्याचबरोबर खानापूर, संकेश्वर, बैलहोंगल, गोकाक, चंदगड या भागात टेम्पो ट्रॅव्हलर धावत असतात. याचबरोबर यल्लम्मा देवस्थान, मायाक्का देवी, गोकाक येथील धबधबा पाहण्यासाठी वरचेवर भाडी असतात. परंतु, शक्ती योजनेमुळे ही भाडीही थंडावली आहेत. शक्ती योजनेमुळे महिलांना मोफत बसप्रवास मिळत असल्याने मॅक्सीकॅबऐवजी काही वेळ थांबून का होईना, पण बसचाच प्रवास महिला करीत आहेत.
सर्वच करांमध्ये दुप्पट वाढ
टेम्पो ट्रॅव्हलरला 22+1 आसनांसाठी पूर्वी 9 हजार रुपये रोड टॅक्स घेतला जात होता. सध्या तो दुप्पट म्हणजेच 18 हजार रुपये करण्यात आला आहे. वाहनाच्या विमा रकमेतही भरमसाट वाढ करण्यात आली आहे. एकीकडे रोड टॅक्स व विमा रकमेत वाढ केली जात असताना दुसरीकडे शक्ती योजनेमुळे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाल्याने व्यवसाय बंद करून इतर व्यवसाय केलेला बरा, असे म्हणण्याची वेळ मॅक्सीकॅब चालकांवर आली आहे.
जिल्ह्यात 700 हून अधिक मॅक्सीकॅब
बेळगाव जिल्ह्यात 700 हून अधिक मॅक्सीकॅब आहेत. मात्र, सरकारच्या शक्ती योजनेमुळे मॅक्सीकॅब व्यवसायाला मोठा दणका बसला आहे. प्रवासी नसल्यामुळे अनेकांनी आपली वाहने विकण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यवसायावर दोन हजारांहून अधिक कुटुंबे अवलंबून असून या सर्वांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रवीण पतके,अध्यक्ष, बेळगाव मॅक्सीकॅब मालक संघटना









