बेळगाव : ज्ञानदीप एड्युकेशन ट्रस्टच्या जी. जी. चिटणीस स्कूलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सुवर्ण महोत्सव स्पोर्ट्स मैदानाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष व्ही. एन. जोशी हे होते. टिळकवाडी येथील जी. जी. चिटणीस स्कूलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सुसज्ज असे अत्याधुनिक क्रीडा संकुलाचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पीडब्ल्यू खात्याचे मंत्री व बेळगाव पालकमंत्री सतीश जारकीहोळी, उत्तरचे आमदार राजू शेठ, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, सभासद अॅड. चंद्रहास अणवेकर, एस. एन. जोशी, मुख्याध्यापिका डॉ. नवीना शेट्टीगार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते नूतन क्रीडा संकुलाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. आमदार राजू शेठ यांच्या हस्ते व्हॉलीबॉल मैदानाचे तर बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते फुटबॉल मैदानाचे व कोनशिलेचे उद्घाटन करण्यात आले.
प्रारंभी इशा वेर्णेकरच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष अॅड. चंद्रहास अणवेकर यांनी संस्थेचा आढावा घेत उपस्थितांचे स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापिका नवीना शेट्टीगार यांनी केला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. 2022-23 च्या शैक्षणिक वर्षात शाळेत उत्तीर्ण झालेल्या गुरुप्रसाद अंकलगी, प्रज्ञा भक्तीवर व ऋतिका मालगेर यांचा व जलतरणपटू वेदा खानोलकर यांचा खास गौरव करण्यात आला. सुसज्ज मैदान उपलब्ध करुन देण्यासाठी सिंहाचा वाटा उचललेल्या इंद्रनील अणवेकर यांचाही खास सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, अनुदानाशिवाय संस्था चालवणे अत्यंत कठिण असते. अशा परिस्थितीत चिटणीस शाळेने आधुनिक क्रीडासंकुलाची उभारणी करुन खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे. शाळेने अभ्यासाबरोबर खेळातही प्राविण्य मिळविले आहे. अशाच प्रकारची प्रगती पुढील काळात व्हावी व शाळेतून राष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार राजू शेठ व बाबासाहेब पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या. यावेळी सुधाकर साळके, माजी उपमहापौर संजय शिंदे, मनोहर पाटील, मनोहर कालकुंद्रीकर, उदय शेट्टी, संताजी संभाजी, इंद्रनील अणवेकर, अरुण पाटील, सुरेश कळेकर, अॅड. एस. बी. बुद्धीहाळ, अॅड. मंजुनाथ गोलीहळ्ळी, विविध शाळेतील क्रीडा शिक्षक, पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जे. सी. थॉमस यांनी सूत्रसंचालन तर झेबा हिने आभार मानले.









