वृत्तसंस्था/ बुडापेस्ट
रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने मॅक्लारेनचा लँडो नोरिस व रेड बुलचा सर्जिओ पेरेझ यांना मागे टाकत येथे झालेल्या हंगेरियन ग्रां प्रि फॉर्मुला वन शर्यतीचे जेतेपद पटकावले. त्याचे या मोसमातील सलग सातवे व रेड बुलचे सलग 12 वे जेतेपद असून त्यांनी मॅक्लारेनचा विक्रम मोडित काढला.
1988 च्या मोसमात आयर्टन सेना व अॅलेन प्रॉस्ट यांनी मॅक्लारेनला सलग 11 शर्यती जिंकून देत विक्रम नोंदवला होता. या मोसमात आणखी शर्यती होणार असल्याने रेड बुल सलग शर्यती जिंकण्याचा नवा विक्रम नोंदवणार हे निश्चित आहे. येथे जेतेपद मिळविल्यानंतर व्हर्स्टापेनने चॅम्पियनशिपची आघाडी आणखी वाढविली असून तिसरे स्थान मिळविणारा त्याचाच संघसहकारी सर्जिओ पेरेझला मागे टाकले आहे. मॅक्लारेनच्या नोरिसने दुसरे स्थान मिळविले. मर्सिडीजच्या लेविस हॅमिल्टनने चौथे, मॅक्लारेनच्या ऑस्कर पियास्ट्रीने पाचवे, चार्लस लेक्लर्कने सहावे, मर्सिडीजच्या जॉर्ज रसेलने सातवे, फेरारीच्या कार्लोस सेन्झने आठवे, अॅस्टन मार्टिनच्या फर्नांडो अलोन्सोने नववे व त्याचा संघसहकारी स्ट्रोलने दहावे स्थान मिळविले.









