इशान किशनचे नाबाद अर्धशतक, विंडीजला 365 धावांचे आव्हान
वृत्तसंस्था/ पोर्ट ऑफ स्पेन
भारतीय क्रिकेट संघ यजमान विंडीजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आता ‘क्लीन स्वीप’च्या मार्गावर आहे. या दुसऱ्या कसोटीतील खेळाच्या चौथ्या दिवशी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने विंडीजच्या पहिल्या डावात 5 गडी बाद केल्यानंतर आता फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विन सोमवारी खेळाच्या सुरुवातीच्या दिवशी प्रभावी कामगिरी करेल, असा अंदाज आहे. खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर विंडीजने दुसऱ्या डावात 2 बाद 76 धावा जमवल्या असून त्यांना खेळाच्या शेवटच्या दिवशी विजयासाठी आणखी 289 धावांची गरज आहे. मात्र पाचव्या दिवशी पावसामुळे खेळ लवकर सुरू होऊ शकला नव्हता.
भारतीय संघाने पहिल्या डावात विंडीजवर 183 धावांची भक्कम आघाडी मिळविली होती. भारताने पहिल्या डावात 438 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजचा पहिला डाव 255 धावात आटोपला होता. विंडीजने खेळाच्या चौथ्या दिवशी 5 बाद 229 या धावसंख्येवरुन आपल्या पहिल्या डावाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचे शेवटचे 5 फलंदाज 26 धावात तंबूत परतले. मोहम्मद सिराजने 5 गडी बाद केले. नंतर भारताने दुसऱ्या डावात आक्रमक फटकेबाजी केली आणि 24 षटकात 2 बाद 181 धावा जमवित चहापानानंतर 35 मिनिटांनी आपला दुसरा डाव घोषित केला. त्यामुळे विंडीजला निर्णायक विजयासाठी भारताकडून 365 धावांचे कठिण आव्हान मिळाले. यशस्वी जैस्वालने 38, कर्णधार शर्माने 57, गिलने नाबाद 29 तर इशान किशनने 34 चेंडूत नाबाद 52 धावा फटकावल्या. शर्मा आणि जैस्वाल यांनी सलामीच्या गड्यासाठी 11.5 षटकात 98 धावांची भागिदारी केली. रोहित शर्मा आणि जैस्वाल हे पाठोपाठ बाद झाल्यानंतर गिल आणि इशान किशन यांनी तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य 79 धावांची भागिदारी केली. विंडीजतर्फे गॅब्रियल आणि वेरिकेन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
विंडीजच्या दुसऱ्या डावाला ब्रेथवेट आणि चंद्रपॉल यांनी सावध सुरुवात करताना 18 षटकात 38 धावांची भागिदारी केली. कर्णधार शर्माने 16 षटकांचा खेळ झाल्यानंतर अश्विनकडे चेंडू सोपविला. अश्विनच्या गोलंदाजीवर कर्णधार ब्रेथवेट उनादकटकरवी झेलबाद झाला. त्याने 52 चेंडूत 5 चौकारांसह 28 धावा जमविल्या. नंतर अश्विनने मॅकेंझीला खाते उघडण्यापूर्वीच पायचीत केले. विंडीजची स्थिती यावेळी 2 बाद 44 अशी होती. चंद्रपॉल आणि ब्लॅकवूड हे अनुक्रमे 24 आणि 20 धावांवर दिवसअखेर खेळत होते. विंडीजने 32 षटकात 2 बाद 76 धावा जमविल्या होत्या.
भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजने कासोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा एका डावात 5 गडी बाद केले आहेत. सिराजची ही कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. रविवारी खेळाच्या चौथ्या दिवशी वारंवार पावसाचा अडथळा आल्याने दुसऱ्या सत्रात केवळ 3 षटकांचा खेळ झाला होता. सोमवारी पुन्हा पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
संक्षिप्त धावफलक – भारत प. डाव : 128 षटकात सर्व बाद 438, विंडीज प. डाव : सर्व बाद 255, भारत दु. डाव : 24 षटकात 2 बाद 181 डाव घोषित (जैस्वाल 38, रोहित शर्मा 57, गिल नाबाद 29, इशान किशन नाबाद 52, अवांतर 5, गॅब्रियल 1-33, वॅरिकेन 1-36), विंडीज दु. डाव : 32 षटकात 2 बाद 76 (ब्रेथवेट 28, चंद्रपॉल खेळत आहे 24, मॅकेंझी 0, ब्लॅकवूड खेळत आहे 20, अवांतर 4, अश्विन 2-33).