पाकिस्तानात पोहोचलेल्या भारतीय महिलेचा दावा
वृत्तसंस्था/ पेशावर
राजस्थानातून पाकिस्तानात गेलेली महिला अंजूविषयी मोठा खुलासा झाला आहे. हा खुलासा तिचा पाकिस्तानी मित्र नसरुल्लाहने केला आहे. प्रेमसंबंधांची बाब नाकारत नसरुल्लाहने अंजू व्हिसा कालावधी संपल्यावर भारतात परतणार असल्याचे सांगितले आहे. अंजू पाकिस्तानात महिलांसोबत असल्याचा दावाही त्याने केला आहे.
अंजूसोबत विवाह करण्याची कुठलीच योजना नाही. आमची मैत्री 2019 मध्ये फेसबुकद्वारे झाली होती. व्हिसाची मुदत संपल्यावर अंजू मायदेशी परतणार आहे. ती कुटुंबातील अन्य महिलांसोबत घरात एका वेगळ्या खोलीत राहत असल्याचे नसरुल्लाहने सांगितले. पाकिस्तानी व्हिसा मिळवून अंजू नसरुल्लाहला भेटण्यासाठी खैबर पख्तूनखवा प्रांतातील ऊपरी दीर जिल्ह्यात पोहाचली होती. अंजू ही मूळची उत्तर प्रदेशची रहिवासी असून विवाहानंतर पतीसोबत राजस्थानात राहत होती.
पाकिस्तानात फिरण्यासाठी आले असून याकरता कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले आहे. सर्वकाही नियोजन अन् तयारी करून आले आहे. एका विवाह सोहळ्यात मी सामील होणार हेती. वाघा सीमेवरून पाकिस्तानात दाखल झाल्याचे अंजूने सांगितले आहे.
पाकिस्तानात माझा एक मित्र असून त्याच्या कुटुंबीयांशी चांगले संभाषण होत आहे. सीमा हैदरसोबत माझी तुलना करणे चुकीचे आहे. मी मायदेशी परतणार असून पाकिस्तानात अत्यंत सुरक्षित आहे. माझ्या पतीपासून मी विभक्त होणार आहे. मुलांना शिकविण्यासाठीच पतीसोबत राहत असून भारतात परतल्यावर वेगळे होण्याचा निर्णय घेणार असल्याचे अंजूने म्हटले आहे. अंजू ही 36 वर्षांची असून तिला दोन मुले आहेत. 2007 साली तिचा विवाह झाला होता.









