संसद कामकाज होऊ न देण्याच्या विरोधकांच्या वृत्तीवर अमित शहा यांची टीका
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मणिपूरसह कोणत्याही विषयावर सविस्तर चर्चा संसदेत करण्यास केंद्र सरकार सज्ज आहे. विरोधी पक्षांनी सभागृहांमध्ये शांतता राखावी. तसे झाल्यास मणिपूरवरही चर्चा केली जाईल. या चर्चेतून त्या राज्यातील सत्य परिस्थितीची माहिती देशाच्या नागरिकांना मिळेल, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षांनी केले आहे. मणिपूरसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: निवेदन दिले पाहिजे, असा विरोधकांचा आग्रह आहे. या वादामुळे संसदेच्या कामकाजावर नकारात्मक परिणाम होत असून चर्चा ठप्प झाली आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा प्रारंभ गेल्या गुरुवारी झाला होता. हा अधिवेशनाचा दुसरा आठवडा आहे. मात्र, आतापर्यंत कोणत्याही विषयावर दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा झालेली नाही. विरोधकांनी मणिपूरच्या मुद्द्यावर मागे हटण्यास नकार दिला आहे. त्यांना पंतप्रधान मोदी यांनी स्वत: सभागृहांमध्ये मणिपूरसंबंधी माहिती द्यावी असे वाटते. यासंबंधी त्यांनी आग्रह धरला आहे. सरकार या विषयावर सविस्तर चर्चा करण्यास राजी आहे. मात्र, विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन करावे, हा आग्रह सोडावा, अशी सरकारची भूमिका आहे.
दोन्ही सभागृहांमध्ये घोषणाबाजी
दोन्ही सभागृहांमध्ये सोमवारी प्रारंभापासूनच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन दिल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही असे विरोधकांनी स्पष्ट केले. अमित शहा यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण विरोधक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. सरकारने मणिपूर मुद्द्यावर चर्चा करण्याची तयारी दर्शविली. तसेच चर्चेला गृहमंत्री अमित शहा उत्तर देतील, असा प्रस्ताव मांडला. मात्र, तो विरोधकांनी अमान्य केला. नंतर सभागृहांचे कामकाज दुपारी 2 पर्यंत स्थगित करण्यात आले. पण त्यानंतरही गोंधळ सुरुच राहिल्याने अखेर ते दिवसभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राजनाथ सिंगांकडून प्रयत्न
संसदेबाहेर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी विरोधी पक्षनेत्यांची भेट घेऊन त्यांना सभागृहांचे कामकाज सुरळीत चालवू देण्याची विनंती केली. मात्र, विरोधकांनी आपला हेका सोडला नाही. उलट मणिपूर मुद्द्यावर आपली भूमिका अधिकच ताठर केली. त्यामुळे सिंग यांची शिष्टाई वाया गेली.
काम हवे आहे
विरोधी पक्षांना संसदेचे काम चालवायचे आहे. तथापि, सरकारने आमची मागणी मान्य करण्यास नकार दिल्याने आमचा नाईलाज आहे, असे प्रतिपादन ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केले. विरोधकांच्या आरोपांचा भाजपच्या खासदारांनी जोरदार प्रतिवाद केला. मणिपूरचा मुद्दा विरोधक केवळ राजकीय लाभासाठी उठवत आहेत, असा आरोप भाजप सदस्यांनी केला.
इतर राज्यांचे काय
महिलांवर अनन्वित अत्याचार करण्याच्या घटना राजस्थान, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि इतर विरोधीपक्षशासित राज्यांमध्येही घडल्या आहेत. त्यांच्याबद्दल विरोधक मूग गिळून गप्प आहेत. कारण त्यांना केवळ मणिपूरच्या घटनांचे राजकीय भांडवल करण्यातच स्वारस्य आहे, अशी टिप्पणी भाजपचे खासदार हरनाथसिंग यादव यांनी केली. विरोधकांची संकुचितता यातून स्पष्ट होते, अशी टीका त्यांनी केली. अनेक विरोधी सदस्यांनी मणिपूरवर चर्चेसाठी स्थगन प्रस्तावाच्या नोटिसा पाठविल्या आहेत. त्यांच्यावर सभाध्यक्षांना निर्णय घ्यावयाचा आहे.
आम आदमी पक्षाचे संजय सिंग निलंबित

गुरुवारी राज्यसभेत मणिपूरच्या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ झाला. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांनी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्याशी वाद घातला. सकाळी कामकाजास प्रारंभ होताच विरोधकांनी मणिपूरच्या विषयावर गदारोळ माजविण्यास प्रारंभ केला. त्यांनी प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याची मागणी केली. ती नाकारण्यात आली. धनखड यांनी हा तास सुरुच राहील अशी सूचना केल्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंग अध्यक्षांच्या आसनाजवळ पोहचले. अध्यक्षांनी त्यांना तेथून जाण्याचा आदेश दिला. मात्र, त्यांनी अध्यक्षांशी हुज्जत घालण्यास प्रारंभ केला. त्यामुळे संतापलेल्या अध्यक्षांनी त्यांचे नाव घेऊन त्यांना जागेवर जाण्याचा आदेश दिला. तरीही ते ऐकेनात. त्यामुळे सभागृहाचे नेते पियुष गोयल यांनी त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. तो संमत झाल्याने अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी संजय सिंग यांना सभागृहातून निलंबित करण्यात आले. संजय सिंग यांना निलंबित करण्याच्या निर्णयाविरोधात विरोधी पक्षांनी निदर्शने केली. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
गोंधळ, गदारोळ हटेना…
ड पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडाही वाया जाण्याची शक्यता
ड संजय सिंग यांनी राज्यसभा अध्यक्षांशी हुज्जत घातल्याने निलंबन
ड लघुकालीन चर्चेसाठी सरकार सज्ज, पण विरोधकांकडून अमान्यता









