आंध्र प्रदेशमध्ये अमित शहा यांच्या हस्ते कार्यक्रम
► वृत्तसंस्था / तिरुपती
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील ‘मंत्रालयम’ येथे प्रभू रामचंद्रांच्या जगातील सर्वात उंच मूर्तीचा शिलान्यास करण्यात आला आहे. सोमवारी हा कार्यक्रम करण्यात आला. प्रभू रामचंद्रांची 108 फूट उंचीची मूर्ती निर्माण करण्याचा हा प्रकल्प असून त्यासाठी 300 कोटी रुपये खर्च येणार आहे, अशी माहिती प्रसारित करण्यात आली आहे.
विश्वविख्यात शिल्पकार राम सुतार यांच्याकडे या मूर्तीचे ओतकाम करण्याचे उत्तरदायित्व सोपविण्यात आले आहे. सुतार यांनी गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा निर्माण करण्याचेही कार्य केले आहे. हा पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या नावाने ओळखला जातो. भगवान रामचंद्रांची मूर्ती निर्माण करण्यासाठी मंत्रालयम येथील श्री राघवेंद्र स्वामीं मठाने 10 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.
जय श्रीराम न्यासाचा प्रकल्प
जगातील सर्वात उंच राममूर्ती निर्माण करण्याचा हा प्रकल्प जय श्रीराम न्यास या संस्थेने हाती घेतला आहे. राममूर्तीसह भव्य राममंदिराचेही निर्माण कार्य केले जाणार आहे. शिलान्यासाच्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनीं भाग घेतला. त्यांच्यात जय श्रीराम न्यासाचे पदाधिकारी, श्री राघवेंद्र स्वामी मठाचे महंत सुबुदेंद्र तीर्थ स्वामी आणि इतर अनेकांचा समावेश होता. सर्वसामान्य रामभक्तांनीही या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. अमित शहा यांनी ट्विटरवरुन या शिलान्यास कार्यक्रमाचे वृत्त देताना या प्रकल्पाची माहितीही दिली आहे.
लवकरात लवकर पूर्ण होणार
हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण केला जाणार आहे. त्यानंतर मंत्रालयला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. धार्मिक पर्यटनाचा विकास करण्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग होईल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने धार्मिक पर्यटनाचा विकास करण्याला प्राधान्यक्रम दिला आहे.