तालिबानचा आरोप : अन्य देशांवर दबाव टाकत असल्याचा दावा
वृत्तसंस्था/ काबूल
अफगाणिस्तानात आमच्या सरकारला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यास अमेरिकेचाच सर्वात मोठा अडथळा असल्याचा दावा तालिबानचे कार्यकारी संरक्षणमंत्री मुल्लाह मोहम्मद याकूब मुजाहिदने केला आहे. सरकारने मान्यता मिळविण्यासाठी सर्व आवश्यकता पूर्ण केल्या आहेत. तरीही अमेरिकेच्या दबावामुळे अन्य देश आम्हाला मान्यता देत नाहीत. अमेरिकेच्या दबावाखाली नसलेल्या देशांना मान्यता देण्याचे आवाहन आम्ही करतो. जगातील शक्तिशाली इस्लामिक देशांनी आम्हाला सरकार म्हणून मान्यता द्यावी असे त्याने म्हटले आहे.
अफगाणिस्तानात आता अल-कायदाचे अस्तित्व नाही. अमेरिका वारंवार आमच्या हवाईक्षेत्रात घुसखोरी करत आहे, अमेरिकेला हा प्रकार बंद करावा लागणार आहे. अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्याचा सन्मान केला जावा असे वारंवार सांगण्यात आले आहे. कुठल्याही देशाच्या भूमीचा वापर अफगाणिस्तान विरोधात केला जाऊ नये असे मुजाहिदने म्हटले आहे.
अफगाणिस्तान आंतरराष्ट्रीय समुदायाशी चर्चा करण्यास आणि त्याच्या चिंता जाणून घेण्यास तयार आहे. सौदी अरेबियाने आम्हाला मान्यता देण्याची तयारी दर्शविल्यास आम्ही आणखी 58 मुस्लीम देशांसोबत चर्चा करण्याची तयारी करत आहोत असे मुजाहिदने म्हटले आहे
सीआयए अन् तालिबान
2021 मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानातून स्वत:चे सैन्य काढून घेतले होते. परंतु अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयए आता तालिबानसोबत वाटाघाटी करत असल्याचा दावा अफगाणिस्तानचे माजी उपाध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी केला आहे. सीआयएने तालिबनाला 2 रशियन एमआय-17 हेलिकॉप्टर्स पुरविली आहेत. ही हेलिकॉप्टर्स दुरुस्तीसाठी यापूर्वी संयुक्त अरब अमिरात येथे नेण्यात आली होती. ही दोन्ही हेलिकॉप्टर्स सीआयएने आता तालिबानला सोपविली आहेत. दोहा कराराद्वारे अमेरिकेने तालिबानला कोट्यावधी डॉलर्स दिले आहेत. याच्या माध्यमातून अमेरिका तालिबानचा वापर स्वत:च्या रणनीतिक हितांसाठी करू पाहतोय असा दावा सालेह यांनी केला आहे.









