बेन अमेरिकेतील खासगी इक्विटी फर्म : कराराद्वारे केला व्यवहार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकेतील खासगी इक्विटी फर्म बेन कॅपिटल यांनी अदानी समूहातील बिगर बँकिंग वित्त कंपनी अदानी कॅपिटल आणि अदानी हाऊसिंगमध्ये 90 टक्के इतकी हिस्सेदारी प्राप्त करण्यासाठी एक करार केला असल्याची माहिती आहे. हिस्सेदारी खरेदीसंबंधीची घोषणा 23 जुलै रोजी करण्यात आली असून यासंदर्भात करण्यात आलेल्या सहकार्याच्या करारावर उभयतांच्या स्वाक्षऱ्या झाल्याचेही समजते.
सध्याला अदानी कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ गौरव गुप्ता यांच्याकडे 10 टक्के हिस्सेदारी असणार असल्याचे समजते. अदानी कॅपिटल कंपनीचे मूल्यांकन 1600 कोटी रुपये इतके आहे. अशाप्रकारे अदानी कुटुंबियांनी आपली बँकिंग व्यवसायातील संपूर्ण हिस्सेदारी विकल्याचे कळते. 2017 मध्ये अदानी कॅपिटलची सुरुवात करण्यात आली होती. बेन कंपनी आता अदानी कॅपिटलमध्ये हिस्सेदारी घेत अतिरीक्त 983 कोटी रुपयांची भर टाकत व्यवसाय विस्ताराची योजना बनवणार आहे.
कोणता आहे नवा प्रकल्प
यादरम्यान अदानी समूहाने गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी अनेक उपाय केले आहेत. याचसोबत पायाभूत सुविधा विकास व्यवसायावरही कंपनीने लक्ष ठेवले असून आगामी काळात मुंबईबाहेर एक नवे विमानतळ उभारण्याचा विचार करत असल्याचे कळते.
काय म्हणाले गौतम अदानी
अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी सीईओ गौरव गुप्ता यांच्या कार्याचे कौतुक केले असून उपनगरी आणि ग्रामीण भारतात त्यांनी कंपनीला ऊर्जा मिळवून देत बहुमुल्य असे योगदान दिले आहे. आता बेन कॅपिटलने विश्वास राखत हिस्सेदारी घेतली असून सदरचा व्यवसाय दुप्पट वेगाने वाढण्यास मदत होणार आहे.









