वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हॉटेल व्यवसाय अलग करण्याचा निर्णय देशातील मोठी एफएमसीजी अर्थात ग्राहकोपयोगी क्षेत्रातील कंपनी आयटीसी यांनी नुकताच घेतला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हॉटेल व्यवसाय स्वतंत्र करण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
नव्या सहकारी कंपनीत आयटीसीचा वाटा 40 टक्के इतका असणार आहे, असेही सांगितले जात आहे. कंपनीच्या समभागधारकांकडे 60 टक्के इतका वाटा असणार आहे. आयटीसी हॉटेल्स समूहाची 120 हॉटेल्स विविध ठिकाणी आहेत. गेल्या काही वर्षात आयटीसी हॉटेल व्यवसायाने एकंदरच भारतीय हॉटेल व्यवसायामध्ये स्वत:ची स्वतंत्र अशी मजबूत ओळख निर्माण केली आहे. यामुळेच हॉटेल व्यवसाय अलग करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.
समभागात घसरण
आयटीसीने हॉटेल व्यवसायाला अलग करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्याचे पडसाद कंपनीच्या समभागावर परिणाम दिसून आला. कंपनीचा समभाग 3 टक्के इतका शेअरबाजारात सोमवारी घसरत 469 रुपयांवर खाली आला होता. एक महिन्यात हा समभाग 7 टक्के वाढलाय, तीन महिन्यात 16 टक्के आणि वर्षभरात 60 टक्के इतका वाढला आहे.