विद्यार्थी शिक्षक आणि महापालिका शिक्षण समितीच्या प्रयत्नांना यश
अहिल्या परकाळे कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 2017 ला घेण्यात आलेल्या पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत महापालिकेच्या टेंबलाईवाडी विद्यालयाचा वर्धन माळीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. अन् शाळेची पटसंख्या झपाट्याने वाढली. या शाळेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महापालिकेच्या 58 शाळांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विशेष प्रयत्न करायला सुरूवात केली. गेल्या पाच वर्षात शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत महापालिकेच्या शाळांची मुले झळकली आहेत. यंदा तर शिष्यवृत्ती परीक्षेत लक्ष्मीबाई जरगनगर शाळेच्या शौर्य पाटील आणि अनन्या पोवार यांनी राज्यात तिसरा तर टेंबलाईवाडी विद्यामंदिरच्या वसुंधरा सावंतने राज्यात पाचवा क्रमांक मिळवला. तसेच महापालिकेच्या शाळांनी राज्य गुणवत्ता यादीत 21 विद्यार्थ्यांनी ‘रेकॉर्ड ब्रेक’ यश मिळवले.
राज्यशासनाची परीक्षा होण्यापुर्वी एक आठवडा अगोदर कोल्हापूर महापालिका आपल्या शाळांची ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज’ शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पहिल्या 25 विद्यार्थ्यांना वर्षाला 2 हजार 500 रूपये अशी दोन वर्षे प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्तीची रक्कम निश्चितच राज्य शासनाच्या शिष्यवृत्तीपेक्षा जास्त आहे. परिणामी 58 शाळांच्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा लागते आणि जवळपास 600 विद्यार्थी दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा देतात. महापालिकेच्या मार्गदर्शनाखाली शाळांमधील शिक्षक विद्यार्थ्यांना ज्यादा तास घेवून मार्गदर्शन करतात. तसेच वर्षभर सुट्टी न देता विषय शिक्षक अभ्यास करवून घेतात. वाचन, चिंतन, मनन आणि वर्षाला 1500 सराव पेपर सोडवून घेतले जातात. परिणामी शिष्यवृत्ती परीक्षेत महापालिकेचे विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकतात. गेल्या पाच वर्षापासून शिष्यवृत्ती परीक्षेत महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी राज्यभर महापालिका शाळांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कोल्हापूर महापालिकेच्या शाळांनी राज्यभरातील शाळांसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळेच इंग्रजी माध्यमातील विद्यार्थीही महापालिकेच्या शाळेत प्रवेश घेत आहेत. त्यामुळे गुढीपाढव्याच्या दिवशी प्रवेश फुल्लचे बोर्ड शाळेच्या ब्लॅकबोर्डवर लागतात. त्यामुळेच टेंबलाईवाडी विद्यालयाची पटसंख्या 600 वरून 1100 तर जरगनगरची पटसंख्या 1500 वरून 2300 झाली आहे. तसेच नेहरूनगर विद्यालय, जाधववाडीतील प्रिन्स शिवजी विद्यामंदिरसह अन्य शाळंच्या पटसंख्येत तिपटीने वाढ झाली आहे. यातूनच महापालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा उत्तम असल्याचे सिध्द होते.
राज्य शासनाने पाच हजार रूपये शिष्यवृत्ती द्यावी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी शिष्यवृत्तीधारकांना 1 हजार रूपये शिष्यवृत्ती दिली जाते. परंतू शिष्यवृत्तीची रक्कम वाढवून पाच हजार रूपये करावी, अशी मागणी सरकारकडे शिक्षक संघटनांनी केली आहे. त्यामुळे पाच हजार शिष्यवृत्ती देण्याचे प्रस्तावित असले तरी अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे त्वरीत शिष्यवृत्तीची रक्कम वाढवावी, अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे.
मनपा प्राथमिक शिक्षण समितीसह शाळांच्या प्रयत्नांना यश
प्राथमिक शिक्षण समिती शिष्यवृत्ती परीक्षा घेवून शिष्यवृत्ती देते. शाळांमधील शिक्षकांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवश्यक तेवढी मदत केली जाते. तसेच शिक्षकही आपल्या शाळेचे नाव शिष्यवृत्ती परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीत यावे म्हणून अटोकाट प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांना सुट्टी नसते याचाच अर्थ शिष्यवृत्ती अभ्यासक्रमाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनाही सुट्टी नसते. याचाच अर्थ विद्यार्थ्यांबरोबर एक प्रकारे शिक्षकांचीही ही परीक्षाच असते.
पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेतील सात वर्षाचा मनपा शाळांच्या यशाचा आलेख
शैक्षणिक वर्ष राज्य गुणवत्ता यादी जिल्हा गुणवत्ता यादी
2016-17 11 36
2017-18 4 27
2018-19 10 33
2019-20 1 37
2020-21 10 47
2021-22 13 61
2022-23 21 63
महापालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा कायम
पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत यश मिळवत शैक्षणिक दर्जा सिध्द केला आहे. विद्यार्थ्यांच्या यशामुळे महापालिकेच्या शाळा राज्यभर प्रकाश झोतात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या यशासाठी शिक्षक अतोनात प्रयत्न करतात आणि विद्यार्थ्यांकडून अभ्यास करुन घेतात. शिष्यवृत्तीचा निकाल पाहून पालकांचा महापालिका शाळांवरील विश्वास वाढतोय. त्यामुळेच इंग्रजी माध्यमातून काढून मुलांना महापालिकेच्या शाळेत प्रवेश घेतात. याचाच अर्थ महापालिकेच्या शाळेचा शैक्षण्कि दर्जा कायम आहे.
पुष्पा गायकवाड (शिक्षिका, लक्ष्मीबाई जरगनगर विद्यालय)
प्रशासनाचे उपक्रम, शिक्षकांचे प्रयत्न
महापालिका प्राथमिक शिक्षण समितीचे शैक्षणिक उपक्रम शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयोगी पडतात. पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयार करण्यात शिक्षकांचे मोठे योगदान आहे. शिक्षकांच्या मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस अभ्यास केल्याने शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढली. म्हणूनच राज्य गुणवत्ता यादीत 21 विद्यार्थी आले. गुणवत्ता यादीत आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
शंकर यादव (प्रशासन अधिकारी, महापालिका प्राथमिक शिक्षण समिती)








