ग्रा. पं. च्या अथक प्रयत्नानंतर भगदाड बुजवले
वार्ताहर /नंदगड
गेल्या चार दिवसापासून मेरडा परिसरात पडत असलेल्या संततधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. मेरडा गावालगतचा तलाव पाण्याने तुडुंब भरला होता. पाण्याची पातळी व दाब वाढल्याने शनिवारी रात्री तळ्याच्या बांधाला भगदाड पडले. त्यामुळे तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले. बांधालगत भातपीक असलेल्या शेतवडीत पाणी घुसल्याने काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तलावाच्या बांधाला भगदाड पडल्याची माहिती रविवारी पहाटे परिसरात पसरली. लागलीच हलगा ग्रामपंचायतचे अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्यासह ग्रा. पं. सदस्य व कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर, जेसीबीच्या साहाय्याने हे भगदाड बुजवले आहे. अध्यक्ष व सदस्यांनी तातडीने उचललेल्या पावलामुळे तलावातून मोठ्याप्रमाणात पाण्याच्या प्रवाहामुळे तलावाचा बांध फुटून होणारे मोठे नुकसान टळले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. तसेच मेरडा व करजगी तलावाच्या बांधावरून जाणारा संपर्क रस्ता बंद झाला असता. हे भगदाड बुजवल्याने गैरसोय दूर झाली आहे.









