वाहतूक बंद : नागरिकांना त्रास : भगदाड बुजविण्याची मागणी
खानापूर : पारिश्वाड-बिडी रस्त्यावरील मलप्रभा नदीवरील पुलाला भगदाड पडल्याने या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील जवळपास 60 गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने हे भगदाड बुजवून या ठिकाणी बॅरीकेड्स लावून रस्ता बंद केलेला आहे. पारिश्वाड-बिडी हा या भागातील मुख्य रस्ता असून या रस्त्यावरून या भागातील 60 गावांचा संपर्कासाठी हा मुख्य रस्ता आहे. मलप्रभा नदीवरील असलेल्या पुलाच्या सुरुवातीलाच हे भगदाड पडून रस्ता खचला आहे. मागीलवर्षीही याच ठिकाणी भगदाड पडून रस्ता खचला होता. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याने तात्पुरती डागडुजी करून वाहतुकीस खुला केला होता. गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने मलप्रभा नदी दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे पहिल्याच पावसाच्या प्रवाहात हे भगदाड पडले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने भगदाड बुजवून बॅरीकेड्स लावून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पारिश्वाड, चिकदिनकोप, देमिनकोप, कोडचवाड, बागेवाडी, अवरोळी, हिरेमुन्नोळी, चिक्कमुन्नोळी, गंदिगवाड, इटगी भागातील नागरिकांना बिडी, हल्याळ, कित्तूर तसेच बैलहोंगलशी संपर्क याच रस्त्यावरून होत असतो. वाहतुकीस रस्ता बंद केल्याने भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अभियंते राजेंद्र होनकांडे यांनी सांगितले की, पूल नव्याने बांधण्यात यावा, यासाठी आराखडा तयार केला असून शासनाने मंजुरी दिल्यास उंची वाढवून नवा पूल बांधणे गरजेचे आहे. अवजड वाहतूक होऊ नये, म्हणून बॅरिकेड्स लावून पुलावरील वाहतूक थांबविली आहे.









