अंतिम लढतीत इंडोनेशियाच्या जागतिक अव्वल मानांकित जोडीचा केला पराभव :
वृत्तसंस्था/ सेऊल (दक्षिण कोरिया)
भारतीय बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रनकीरे•ाr आणि चिराग शेट्टी यांनी कोरियन ओपनचे विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. पुरुष दुहेरीत सात्विक आणि चिरागने अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या फजर अल्फियान आणि मुहम्मद रियान अर्दियांतोला नमवण्याची किमया साधली. त्यांनी या जोडीला 17-21, 21-13, 21-14 असे पराभूत केले. विशेष म्हणजे, सात्विक-चिराग या भारतीय जोडीने पहिल्यांदाच कोरियन ओपनचे जेतेपद पटकावले आहे. या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी सात्विक-चिरागचे अभिनंदन केले आहे.

उपांत्य फेरीत या भारतीय जोडीने जगातील दुसऱ्या क्रमांकाची जोडी असलेल्या चीनच्या लियांग वेई केंग आणि वांग चांग या जोडीचा पराभव केला. अंतिम फेरीत पण भारतीय जोडीने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत विजेतेपद पटकावले. या विजयानंतर दोघांनीही जल्लोष केला आणि प्रत्येक वेळेप्रमाणेच जोरदार डान्स केला. दोघांनी गंगनम स्टाइलमध्ये डान्स करत जोरदार जल्लोष साजरा केला.
दरम्यान, दोघांच्या कारकिर्दीतील हे तिसरे सुपर 500 विजेतेपद आहे. यापूर्वी या दोघांनी 2019 मध्ये थायलंड ओपन, 2022 मध्ये इंडिया ओपन जिंकली आहे. यानंतर भारतीय जोडीने प्रथमच कोरिया ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या वर्षातील या दोघांचे हे तिसरे जेतेपद ठरले आहे. भारतीय जोडीने यावर्षी स्वीस ओपन, मागील महिन्यात इंडोनेशियन ओपन आणि आता कोरियन ओपनचे अजिंक्यपद पटकावले आहे.
प्रथमच कोरियन ओपनचे जेतेपद
कोरियन ओपन बॅडमिंटन स्पर्धा ही जगतातील मानाची स्पर्धा मानली जाते. यामध्ये अनेक आघाडीचे खेळाडू भाग घेत असतात. यामध्ये भारताच्या जोडीने जेतेपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी साकारली. सुरुवातीला आक्रमक खेळणाऱ्या इंडोनेशियाच्या अव्वल मानांकित जोडीने पहिला गेम 21-17 असा जिंकत 1-0 अशी आघाडी मिळवली. या गेममध्ये प्रतिस्पर्धी जोडीने आक्रमक खेळताना अवघ्या 18 मिनिटात हा गेम आपल्या नावे केला.
दुसऱ्या गेममध्ये मात्र सात्विक व चिराग जोडीने दमदार पुनरागमन करताना हा गेम 21-13 असा सहज जिंकत सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. भारतीय जोडीने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारताना प्रतिस्पर्धी जोडीला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. यानंतर तिसऱ्या व निर्णायक गेममध्ये भारतीय जोडीचा वरचष्मा पहायला मिळाला. एकवेळ प्रतिस्पर्धी इंडोनशियन जोडीने 7-7 अशी बरोबरी साधली होती. पण आक्रमक खेळणाऱ्या सात्विक-चिराग जोडीसमोर त्यांचा निभाव लागला नाही. हा गेम भारतीय जोडीने 21-14 असा जिंकत ही स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केला.
स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारतीय जोडी अजिंक्य
जागतिक स्तरावर कोरिया ओपन स्पर्धा प्रतिष्ठेची समजली जाते. या स्पर्धेला 1991 मध्ये सुरुवात झाली. आजपर्यंत या स्पर्धेवर चीन, दक्षिण कोरिया, मलेशिया इंडोनेशिया या देशातील खेळाडूंचे वर्चस्व राहिले. 2017 मध्ये महिला एकेरीचे जेतेपद सिंधूने पटकावत ही स्पर्धा प्रथमच जिंकली होती. यानंतर पुरुष दुहेरीमध्ये सात्विक-चिराग जोडीने ही स्पर्धा पहिल्यांदाच जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
प्रतिक्रिया
कोरियन ओपन स्पर्धेतील जेतेपद हे अविस्मरणीय आहे. उपांत्य व अंतिम फेरीत दिग्गज खेळाडूंविरुद्ध चांगलाच कस लागला. पण, इच्छाशक्तीच्या जोरावर हे यश मिळवता आले. आता, पुढील स्पर्धांमध्ये सरस कामगिरी करण्याचा मानस असेल.
-सात्विकसाईराज व चिराग शेट्टी, भारतीय बॅडमिंटनपटू.
दृष्टीक्षेपात सात्विक-चिराग
- सात्विक-चिरागचे हे कारकिर्दीतील सातवे जेतेपद. गतवर्षी इंडिया ओपन, फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकल्या, तर 2019 मध्ये या जोडीने थायलंड ओपन आणि 2018 मध्ये हैदराबाद ओपन स्पर्धा जिंकली होती.
- सात्विक-चिराग यांनी 2022 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती.
- 2023 मध्ये सात्विक-चिरागने प्रथमच स्विस ओपन स्पर्धा जिंकली. यानंतर इंडोनेशिया ओपन स्पर्धा जिंकत कारकिर्दीतील सहावे जेतेपद पटकावले.
- यंदाच्या वर्षी बॅडमिंटन आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकण्याची कामगिरी. आता, कोरियन ओपन प्रथमच जिंकत रचला इतिहास.









