पंतप्रधानांच्या हस्ते बुधवारी होणार भव्य संकुलाचे उद्घाटन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार, 26 जुलै रोजी येथे पुनर्विकसित ‘आयटीपीओ’ संकुलाचे उद्घाटन करणार आहेत. या भव्य संकुलामध्ये सप्टेंबरमध्ये जी-20 नेत्यांची बैठक होणार आहे. प्रगती मैदान कॉम्प्लेक्स या नावानेही ओळखले जाणारे हे ठिकाण सुमारे 123 एकर क्षेत्रात विस्तारले आहे. उद्घाटनानंतर हे ठिकाण देशातील सर्वात मोठे एमआयसीई (मीटिंग्ज, इन्सेन्टिव्ह, कॉन्फरन्स आणि एक्झिबिशन) डेस्टिनेशन ठरणार आहे. तसेच जर्मनीमधील हॅनोव्हर प्रदर्शन केंद्र, शांघायमधील एनईसीसी अशा मोठ्या केंद्रांशी स्पर्धा करत आहे.
‘आयटीपीओ’ संकुलाची भव्यता आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर जागतिक दर्जाचे कार्यक्रम आयोजित करण्याच्या भारताच्या क्षमतेची साक्ष आहे. या संकुलातील कन्व्हेन्शन सेंटर-3 मध्ये 7,000 लोकांची आसन क्षमता असून ते ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित सिडनी ऑपेरा हाऊसच्या 5,500 इतक्या आसन क्षमतेपेक्षा मोठे आहे. तसेच 3,000 लोकांच्या आसनक्षमतेचे भव्य अॅम्फीथिएटरही साकारण्यात आले आहे. या संकुलाच्या भव्यतेमुळे ते जागतिक पातळीवरील मेगा कॉन्फरन्स, आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यासाठी एक योग्य ठिकाण बनवण्यात आले आहे. येथील रस्ते सिग्नल-मुक्त असून पाहुण्यांना कोणत्याही त्रासाशिवाय सुलभतेने घटनास्थळी पोहोचता येणार आहे.









