सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपद भूषविण्यात देशात दुसऱ्या स्थानी : ज्योती बसू यांना टाकले मागे
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक शनिवारी देशातील सर्वात जास्त काळ कार्यरत असणारे दुसरे मुख्यमंत्री ठरले. त्यांनी पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा विक्रम मोडला आहे. देशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम आजही सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांच्या नावावर आहे. चामलिंग हे 12 डिसेंबर 1994 ते 27 मे 2019 पर्यंत 24 वर्षे मुख्यमंत्री होते.
ओडिशाचे पाचवेळा मुख्यमंत्री राहिलेले पटनायक यांनी 5 मार्च 2000 रोजी पदभार स्वीकारला. त्यापासून आज सोमवार, 24 जुलै रोजी त्यांच्या कारकिर्दीला 23 वर्षे आणि 140 दिवस पूर्ण होत आहेत. बसू यांनी 21 जून 1977 ते 5 नोव्हेंबर 2000 पर्यंत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना 23 वर्षे आणि 137 दिवस इतका कार्यकाळ गाठला होता. नवीन पटनायक अजूनही मुख्यमंत्रीपदी सक्रियपणे कार्यरत असून त्यांच्याकडून पवनकुमार चामलिंग यांचा विक्रमही पादाक्रांत होऊ शकतो. सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांच्यानंतर मुख्यमंत्री म्हणून त्यांचा दुसरा सर्वात मोठा कार्यकाळ आहे. चामलिंग यांनी सिक्कीमवर 24 वर्षे 166 दिवस ‘राज्य’ केले होते.
5 वेळा मुख्यमंत्री होणारा तिसरा नेता
चामलिंग आणि बसू यांच्यानंतर सलग पाचवेळा राज्याचे मुख्यमंत्री होणारे पटनायक हे तिसरे नेते आहेत. सत्ताधारी बिजू जनता दल 2024 च्या विधानसभा निवडणुकीत जिंकले तर पटनायक हे भारतातील सर्वात जास्त काळ काम करणारे मुख्यमंत्री असतील.
सर्वपक्षीयांकडून अभिनंदन
आपल्या कारकिर्दीचा नवा विक्रम रचणाऱ्या नवीन पटनायक यांचे बिजू जनता दलासह सर्वपक्षीयांनी अभिनंदन केले आहे. बीजेडी उपाध्यक्ष प्रसन्न आचार्य यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करताना “आम्हाला आनंद आहे की आमच्या मुख्यमंत्र्यांनी पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा विक्रम मोडला आहे. आता पटनायक हे भूतकाळातील सर्व विक्रम मोडीत काढत सर्वाधिक काळ काम करणारे मुख्यमंत्री बनतील” असे म्हटले आहे. राज्यातील भाजप आणि काँग्रेस नेत्यांनीही त्यांच्या या विक्रमाबद्दल शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.
शांत स्वभाव अन् स्वच्छ प्रतिमा
भारतीय राजकारणात साधारणपणे असे मानले जाते की जे नेते प्रभावी भाषण करतात आणि सतत चर्चेत राहतात तेच नेते दीर्घकाळ सत्तेत राहू शकतात. पण ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी हा तर्क खोटा असल्याचे सिद्ध केले आहे. नवीन पटनाईक हे आपल्या शांत आणि नितळ प्रतिमेने आतापर्यंत प्रादेशिक राजकारणात अविचल राहिले आहेत. अटलबिहारी वाजपेयी असो, केंद्रातील यूपीए सरकार असो किंवा पूर्ण बहुमत असलेले नरेंद्र मोदी यांचे मजबूत सरकार असो, पण ओडिशाच्या राजकारणात नवीन पटनायक यांच्यावर कोणीही मात करू शकलेले नाही.









