काही भागात हिंसाचार-जाळपोळ : मैतेई समुदायाच्या लोकांचे पलायन
वृत्तसंस्था/ ऐझवाल
मणिपूरमध्ये महिलांना विवस्त्र करून धिंड केल्याच्या प्रकरणाचे पडसाद ठिकठिकाणी सुरूच आहेत. व्हिडिओ समोर आल्यानंतर मणिपूरसह शेजारील राज्य मिझोराममध्येही परिस्थिती बिघडली आहे. येथे राहणाऱ्या मैतेई समाजातील शेकडो लोकांनी स्थलांतर करण्यास सुऊवात केली आहे. हे लोक आसाम आणि मणिपूरला परतत असून सरकारने त्यांच्यासाठी विशेष विमानसेवाही सुरू केली आहे. दुसरीकडे, मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. चुराचंदपूर आणि इंफाळजवळ मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये रात्रभर गोळीबार झाला. यावेळी स्वयंचलित रायफल, पॉम्पी गन आणि इतर स्फोटकांनी हल्ला करण्यात आला. बिष्णुपूरमध्ये जमावाने शाळा आणि अनेक घरे जाळली. याशिवाय थोरबुंग, कांगवे या अंतर्गत भागातही गोळीबार सुरू आहे. घटनास्थळी सुरक्षा दलाचे अतिरिक्त जवान पाठविण्यात आले आहेत.
मणिपूरच्या शेजारील राज्य मिझोराममध्ये राहणारे मैतेई समुदायाचे लोक घाबरले आहेत. येथे मैतेई समुदायाचे 10 हजारांहून अधिक लोक आहेत. मिझोराममध्ये राहणाऱ्या कुकी समुदायाच्या लोकांनी सोमवार, 24 जुलै रोजी आयझाँलमध्ये मोठी रॅली काढण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत या रॅलीनंतर त्यांनाही लक्ष्य केले जाऊ शकते, अशी भीती येथे राहणाऱ्या मैतेई समाजाच्या लोकांना आहे. दहशतीमुळे या लोकांनी स्थलांतर करण्यास सुऊवात केली आहे. त्याचबरोबर कुकी समुदायाचे लोकही मणिपूरमधून स्थलांतरित होऊन मिझोरामला पोहोचत आहेत.
मिझोराम सरकारने मैतेई समुदायाच्या सुरक्षेसाठी राजधानी आयझाँलमध्ये चार बटालियन पॅम्प स्थापन केले आहेत. मणिपूर-मिझोराम सीमेवरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मणिपूरमधून व्हिडिओ समोर आल्यानंतर मिझोराममधील वातावरणही बदलले आहे.








