दलाई लामांचा प्रत्येक निर्णय मंजूर : तिबेट सरकारची भूमिका
► वृत्तसंस्था / धर्मशाळा
चीनने अलिकडेच तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा यांच्याशी संपर्क साधला आहे. दलाई लामांशी चिनी नेत्यांनी सुमारे एक आठवड्यापूवीं संपर्क साधला होता. चीनने दलाई लामांसोबत नेमकी कुठल्या मुद्द्यावर चर्चा केली हे अद्याप समोर आलेले नाही. मी नेहमीच चर्चेसाठी तयार असल्याचे सुचक वक्तव्य दलाई लामांनी केले आहे.
तिबेटला चीनने गिळकृंत केल्यावर दलाई लामांनी भारतात धाव घेतली होती. भारतात राहून तिबेटचे एक सरकार देखील त्यांनी स्थापन केले होते. याला तिबेट गव्हर्नमेंट इन एक्झाइल म्हटले जाते. अलिडकेच या सरकारच्या मंत्री नॉर्जिन डोल्मा जपानच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. चीन अनधिकृतपणे बॅकडोअर स्वरुपात दलाई लामांसोबत चर्चा करत आहे. ही चर्चा अत्यंत आवश्यक आहे. दलाई लामा तिबेट प्रश्नावर जो तोडगा काढतील त्यावर आम्ही सर्वजण सहमत असू असे डोल्मा यांनी म्हटले आहे.
चीन आता बदलत असून मी त्याच्यासोबत चर्चा करण्यास तयार आहे. तिबेटच्या प्रश्नावर ज्यांना तोडगा काढायचा आहे, ते मला भेटू शकतात. आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य नको आहे. अनेक वर्षांपूर्वीच आम्ही चीनचा हिस्सा म्हणून कायम राहू असा निर्णय घेतला होता असे दलाई लामा यांनी स्वत:च्या जन्मदिनी म्हटले होते. तर तिबेटी लोकांची भावना अत्यंत मजबूत असल्याची जाणीव चीनला झाली आहे. याचमुळे चीन आता संपर्क साधू लागल्याचेही त्यांनी नमूद केले होते.
चर्चेसाठी हीच योग्य वेळ
दलाई लामा स्वत:च्या वयोमानामुळे आता विविध देशांचा दौरा करू कशत नाहीत. अशा स्थितीत दोन्ही बाजूंसाठी चर्चा करणे आवश्यक ठरले आहे. तिबेटी सरकारसाठी दलाई लामा सर्वात मोठी शक्ती आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावर दलाई लामा हेच या सरकारला ओळख मिळवून देतात. तर सध्या अन्य जागतिक मुद्द्यांमुळे बहुतांश देशांचे लक्ष तिबेटवरून हटल्याने चीनसाठी ही योग्य वेळ आहे. तिबेट दीर्घकाळापासून पाश्चिमात्य देशांच्या अजेंड्यात सामील नाही. पाश्चिमात्य देशांचे या प्रश्नातील योगदान हे प्रामुख्याने दलाई लामांमुळेच असल्याचे चीन जाणून आहे. याचमुळे चीन स्वत:च्या बाजूने वाटाघाटी इच्छित असल्यास त्यासाठी दबाव निर्माण करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत चीनच्या एथनिक पॉलिटिक्सविषयीचे तज्ञ बॅरी सॉटमन यांनी व्यक्त केले आहे.
चीन निवडू पाहतो पुढील दलाई लामा
चीनसोबत तणावादरम्यान मार्च 1959 मध्ये दलाई लामा हे सैनिकाच्या वेषात तिबेटमधून भारतात पोहोचले होते. मागील 64 वर्षांपासून ते हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा येथे राहत आहेत. चीन सातत्याने दलाई लामांना फुटिरवादी आणि तिबेटसाठी धोका ठरवत आहे. चीन सरकारकडून मान्यता असलेल्या दलाई लामा अन् पंचेन लामाला मंजुरी देऊ अशी घोषणा चीनच्या विदेश मंत्रालयाने 2011 मध्ये केली होती.