Yavatmal Rain Update : यवतमाळ जिल्ह्यात पुरामुळे 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. आज ते दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली.पाटील यांनी रविवारी यवतमाळ दौऱ्यावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच जिल्ह्यातील 1600 हून अधिक पूरग्रस्त कुटुंबांना तातडीने अन्नधान्य वाटप आणि 5000 रुपयांची मदत देण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासनाला दिले. पुरामुळे यवतमाळमधील अनेक घरे, रस्ते पाण्यात बुडाले आहेत.
यावेळी बोलतान ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांत यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस झाला असून, जिल्ह्यातील 77 हून अधिक ठिकाणी 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. शनिवारी अकोला आणि सावर गावात दोन जण पुरात वाहून गेले आहेत. तर वाघाडी गावात घर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.
नुकसानीचा अहवाल लवकरच राज्य मंत्रिमंडळासमोर मदतीसाठी मांडणार असून, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. शनिवारी मरण पावलेल्या तिघांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये दिले जातील, असेही मंत्री म्हणाले. पीक आणि इतर नुकसानीचा पंचनामा कृषी विभाग लवकरच पूर्ण करेल आणि बाधितांना द्यावयाच्या भरपाईबाबत निर्णय घेईल, असेही ते म्हणाले.
तसेच आनंदनगरतांडा ता.महागाव जि.यवतमाळ येथे पुराच्या पाण्यामुळे अडकलेल्या सर्व 105 ते 110 नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. यवतमाळ, बुलढाणा जिल्हा सह इतर ठिकाणच्या पूर परिस्थितीचा प्रशासनाच्या माध्यमातून आढावा घेत असून, नागरिकांना सतर्क राहण्याच्या योग्य त्या सूचना तेथील स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले की, जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून, पाऊस आणि पुरामुळे 1426 घरांचे नुकसान झाले आहे. सुमारे 280 लोकांना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर 6275 लोकांना तात्पुरत्या निवासस्थानी हलवण्यात आले असून त्यांची व्यवस्था करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.








