सांगरूळ,वार्ताहर
Kolhapur Rain Update : पावसाचे प्रमाण वाढल्याने सांगरूळ ग्रामपंचायतीने डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या सत्तावीस कुटुंबांना स्थलांतरित होण्याची नोटीस बजावली आहे.पूर रेषेतील कुटुंबांनाही नोटीस बजावणार असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली आहे.
सांगरूळच्या पश्चिम बाजूस जोतिबा डोंगर असून या डोंगराच्या पायथ्याशी २७ कुटुंब राहतात. ग्रामपंचायतीच्या वतीने २०१२ पासून गेली अकरा वर्षे या कुटुंबाना पावसाळ्यात स्थलांतर होण्याची दरवर्षी नोटीस दिली जाते.रायगड जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे शासकीय पातळीवर सर्वत्र प्रशासन दक्ष झाले आहे. सध्या जोरदार पाऊस सुरू असल्याने डोंगरावरील दरडी कोसळण्याच्या शक्यता नाकारता येत नाही.नागरिकांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने या सर्व कुटुंबांना स्थलांतरित होण्याच्या सूचना नोटीसीद्वारे केल्या आहेत. सांगरूळ मल्हार पेठ सावर्डे रोड सांगरूळ ते कुडित्रे फॅक्टरी रोडवरील रेषेतील कुटुंबांना सुरक्षितता म्हणूनच स्थलांतराची नोटीस बजावणार असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले ‘यावेळी सरपंच शितल खाडे उपसरपंच सुभाष सुतार बदाम खाडे रवींद्र खाडे बाळासो खाडे यांचे सह सदस्य व कर्मचारी उपस्थित होते .
पूर रेषेतील कुटुंबाला नोटीस बजावणार
डोंगर भागात पावसाचा जोर आहे मैदान भागातील काही भाग पावसाळ्यात पाण्याने खचण्याची राहणाऱ्या सत्तावीस कुटुंबाला स्थलांतरित होण्याच्या नोटीस दिली आहेत योग्य ठिकाणी या कुटुंबांना स्थलांतरित करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाचा पाठपुरावा सुरू आहे.पूररेषेतील कुटुंबानाही नोटीस बजावणार आहे
अमोल काजवे, ग्रामविकास अधिकारी
प्रशासनास सहकार्य करावे
पावसाच्या पाण्याने डोंगर खचून दरड कोसळण्याची घटना घडू शकते.त्यामुळे डोंगरपायथ्याशी राहणाऱ्या कुटुंबांनी आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी स्थलांतरित होऊन ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे.
शितल खाडे, लोकनियुक्त सरपंच