Kolhapur Heavy Rain Update : हवामान विभागाने शनिवारी जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला होता. पण सकाळपासून रात्री उशीरापर्यंत ऑरेंज अलर्टप्रमाणे मुसळधार पाऊस झाला.त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जोरदार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून,82 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. रात्री 12 वाजता पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फुट 8 इंच असून, धोका पातळी 43 फुटापर्यंत आहे.आज सकाळी 8 च्या दरम्यान पंचगंगेचे पाणी गायकवाड वाड्यापर्यंत पोहचले असून, गंगावेश ते शिवाजी पूल रस्ता बंद करण्यात आला आहे. सुतार वाडा येथे रात्री व सकाळी नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या अग्निशामन विभागाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच दूधगंगा नदीवरील बाचणी येथील बंधारा पाण्याखाली गेला आहे.
दुसरीकडे राधानगरी धरण 77 टक्के भरले असून 1350 क्युसेस जलविसर्ग सुरु आहे. 26 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्टचा अंदाज वर्तवल्यामुळे पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. 13 प्रमुख जिल्हा मार्ग आणि 6 राज्य मार्ग बंद झाल्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे. पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे सुरु असल्यामुळे जिल्ह्यातील नागरीकांनी सतर्क रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.









