जलाशय भरण्यास सात फूट पाणी आवश्यक
वार्ताहर/ तुडये
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय पाणक्षेत्रात सलग सहाव्या दिवशीही दमदार पावसाचा जोर कायम राहिल्याने पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. शनिवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने सकाळच्या पाणीपातळीत अडीच फुटाने वाढ झाली आहे. सायंकाळी पाणी पातळी 2468.20 फुटावर गेली आहे. पूर्ण क्षमतेने जलाशय होण्यासाठी आता केवळ 7 फूट पाण्याची आवश्यकता आहे.
जलाशय परिसरात शनिवारी सकाळी 24 तासांत 71.7 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तर एकूण 910.6 मि. मी. पाऊस झाला आहे. शुक्रवारच्या असलेल्या 2462.40 फूट पाणी पातळीत 3.30 फूट पाण्याची भर पडत पाणी पातळी 2465.79 फुटापर्यंत येऊन पोहोचली आहे.
डेडस्टॉकनंतर 21 फूट पाण्यात वाढ
पावसाने ओढ दिल्याने 5 जुलैपर्यंत जलाशय पाणी पातळी ही डेडस्टॉकमधील होती. 2447 फुटावरील पाणी पातळीत 17 जुलैपर्यंत 5 फूट पाणी पातळीत वाढ झाली होती. शनिवारी सायंकाळपर्यंत एकूण 21 फूट पाणीपातळीत वाढ झाली आहे. 17 जुलै ते 22 जुलैच्या सायंकाळपर्यंत सहा दिवसाच्या कालावधीत तब्बल 16 फूट पाणी पातळीत वाढ झाली आहे. आता केवळ 7 फूट पाण्याची आवश्यकता आहे. जलाशय पाणी पातळीत वाढ झाल्याने बेळगाव शहरवासियांना समाधानकारक ठरले आहे.
आज होणार जुनी पाणी पातळी पूर्ण
राकसकोप जलाशयाची स्थापना 1962 साली झाली. त्यावेळी बेळगाव शहराच्या लोकसंख्येस अनुसरून 2470 फूट पाणी पातळी ठेवण्यात आली होती. यामध्ये शहराच्या पाणी मागणीत प्रचंड वाढ झाल्याने 1984 साली मार्कंडेय नदीला सहा वेस्टवेअरचे दरवाजे उभारत 5 फूट पाणीपातळी वाढविण्यात आली. त्यानंतर 2015 पर्यंत पातळी 2475 फुटावरच होती. यामध्ये सहाव्या दरवाजांवर लोखंडी पत्रे वेल्डिंग करून बसवत पाणी पातळी 2478 फूट करण्यात आली आहे. ओव्हरफ्लोचे पाणी सोडल्यास पाणी पातळी 2480 फुटापर्यंत जाते. मागील वर्षी तुडयेसह मळवी येथील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे नुकसान टाळण्याकरिता पाणी पातळी 2475 फुटावरच रोखून धरल्याने पाणीपातळी याच अंतरावर ठेवण्यात आली होती. शनिवारीच्या 2468.20 फूट पातळीत आणखी किमान दोन फूट पाणी वाढणार असल्याने रविवारी सकाळी जलाशयाची जुनी पाणीपातळी पूर्ण होणार आहे.









