कोहलीचे शतक, जैस्वाल, शर्मा, जडेजा, अश्विन यांची अर्धशतके
वृत्तसंस्था/ पोर्ट ऑफ स्पेन
येथे सुरू असलेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत शुक्रवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी भारताने पहिल्या डावात 438 धावांची मजल मारली. त्यानंतर यजमान विंडीजने पहिल्या डावात दिवसअखेर 1 बाद 86 धावा जमवल्या. भारतातर्फे कोहलीने दमदार शतक झळकवले तर यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांनी अर्धशतकांची नेंद केली. विंडीजतर्फे रॉच आणि वेरिकेन यांनी प्रत्येकी 3 तर होल्डरने दोन गडी बाद केले.
दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारताने पहिला सामना केवळ तीन दिवसात मोठ्या फरकाने जिंकून विंडीजवर आघाडी मिळवली आहे. त्यानंतर दुसऱ्या कसोटी भारताने 4 बाद 288 या धावसंख्येवरून दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. कोहलीने जडेजासमवेत पाचव्या गड्यासाठी 159 धावांची भागीदारी केली. कोहलीने 11 चौकारासह 121 धावा झळकवल्या. विंडीजने दुसऱ्या दिवशीच्या प्रारंभीच नवा चेंडू घेतला. भारताचे त्रिशतक 530 चेंडूत झळकले. खेळाच्या पहिल्या सत्रात कोहलीने आपले शतक 180 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने तर जडेजाने आपले अर्धशतक 4 चौकारांच्या मदतीने नोंदवले. विराट कोहली जोसेफच्या अचूक फेकीवर धावचित झाला. उपाहारापूर्वी रविंद्र जडेजा रॉचच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने पाच चौकारांसह 61 धावा जमवल्या. उपाहारावेळी भारताने 108 षटकात 6 बाद 373 धावा जमवल्या होत्या.

खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये रविचंद्रन अश्विनने पुन्हा एकदा उपयुक्त फलंदाज असल्याचे सिद्ध केले. इशान किसन आणि अश्विन यांनी सातव्या गड्यासाठी 33 धावांची भर घातली. होल्डरने इशान किसनला झेलबाद केले. त्याने 37 चेंडूत 4 चौकारांसह 25 धावा जमवल्या. जयदेव उनादकट सात धावांवर बाद झाला. मोहमद सिराजला आपले खातेही उघडता आले नाही. अश्विनने 75 चेंडूत 7 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. रॉचने अश्विनचा त्रिफळा उडवून भारताला 438 धावांवर रोखले. अश्विन शेवटच्या गड्याच्या रुपात बाद झाला. 8 चौकारांसह 56 धावा केल्या. विंडीजतर्फे केमर रॉच, वेरिकेन यांनी प्रत्येकी 3, होल्डरने 2 तर गॅब्रियलने एक गडी बाद केला. चहापानावेळी भारताचा पहिला 128 षटकात 438 धावावर समाप्त झाला.
खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये विंडीजची सलामीची जोडी कर्णधार व्रेग ब्रेथवेट आणि टी. चंद्रपॉल यांनी सावध सुरुवात करताना 34.2 षटकात 71 धावांची भागीदारी केली. फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजाने विंडीजची ही सलामीची जोडी फोडण्यात यश मिळवले. जडेजाच्या गोलंदाजीवर चंद्रपॉल अश्विन करवी झेलबाद झाला. त्याने 95 चेंडूत 4 चौकारांसह 33 धावा जमवल्या. त्यानंतर ब्रेथवेट आणि मॅकेन्झी या जोडीने संघाची पडझड होऊ दिली नाही 41 षटकात विंडीजने पहिल्या डावात 1 बाद 86 धावा जमवल्या. ब्रेथवेट 3 चौकारांसह 37 तर मॅकेन्झी 1 षटकार 1 चौकारांसह 14 धावांवर खेळत आहेत. जडेजाने 12 धावात एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : भारत प. डाव 128 षटकात सर्वबाद 438 (जैस्वाल 1 षटकार आणि 9 चौकारांसह 74 चेंडूत 57, रोहित शर्मा 2 षटकार आणि 9 चौकारांसह 143 चेंडूत 80, गिल 2 चौकारांसह 10, कोहली 206 चेंडूत 11 चौकारांसह 121, रहाणे 8, जडेजा 152 चेंडूत 61, इशान किसन 4 चौकारांसह 25, अश्विन 78 चेंडूत 8 चौकारांसह 56, उनादकट 7, सिराज 0, मुकेशकुमार नाबाद 0, अवांतर 13, रॉच 3-104, गॅब्रियल 1-74, वॅरिकेन 3-89, होल्डर 2-57). विंडीज प. डाव 41 षटकात 1 बाद 86 (क्रेग ब्रेथवेट खेळत आहे 37, टी. चंद्रपॉल 4 चौकारांसह 33, मॅकेन्झी खेळत आहे 14, अवांतर 2, जडेजा 1-12).









