व्हिडिओ प्रकरणानंतर सरकारकडून दक्षता
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमधील व्हिडिओ प्रकरणानंतर अधिक दक्षता घेत कुकी आणि मैतेई समुदायाचे वास्तव्य असलेल्या सीमावर्ती भागात लष्कर आणि आसाम रायफल्सची तैनाती वाढवण्यात आली आहे. याशिवाय लष्कराने रस्त्यांवर अनेक ठिकाणी बंकर बांधण्यास सुऊवात केली आहे. भारतीय लष्करासह आसाम रायफल्स, सीआरपीएफ आणि बीएसएफच्या तैनातीसोबतच हवाई निगराणीही वाढवण्यात आली आहे.
मणिपूरमध्ये दोन महिन्यांहून अधिक काळ जातीय हिंसाचार सुरू आहे. बुधवारी मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेवरून संसदेत गदारोळ झाला. या व्हिडिओमध्ये जमाव काही महिलांची विवस्त्र धिंड काढत होता. महिलांना सोडण्यापूर्वी जमावाने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
या घटनेचा मोठ्या प्रमाणावर निषेध झाल्यानंतर याप्रकरणी कांगपोकपी जिह्यातील सैकुल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. ही घटना 4 मे रोजी घडली असली तरी व्हिडिओ बुधवारी रात्री व्हायरल झाला होता. ही लाजिरवाणी घटना घडलेल्या महिलांपैकी एक भारतीय लष्कराच्या माजी सैनिकाची पत्नी असल्याचेही स्पष्ट झाले आहे. मणिपूरमध्ये 3 मे पासून सुरू झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 160 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला असून हजारो लोक बेघर झाले आहेत.
पाचव्या आरोपीला अटक
मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करून सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. मणिपूर घटनेत आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी 20 जुलै रोजी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. राज्याच्या कांगपोकपी जिह्यात 4 मे रोजी घडलेल्या घटनेतील पाचव्या व्यक्तीला अटक करण्यात आल्याचे शनिवारी अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचे वय सुमारे 19 वर्षे आहे. आता इतर आरोपींना पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून आरोपींच्या संभाव्य ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत.
राजीनामा देण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
मणिपूरमधील घटनेपासून मुख्यमंत्री एन बिरेन सिंग लोकांच्या निशाण्यावर असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र, बिरेन सिंह यांनी राजीनामा देण्यास नकार देत सध्या राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यावर आपले लक्ष असल्याचे सांगितले.









