मणिपूरपाठोपाठ देशात दुसरा घृणास्पद प्रकार, व्हिडीओ प्रसारित, आरोप-प्रत्यारोप
वृत्तसंस्था / कोलकाता
मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पश्चिम बंगालमध्येही अशाच प्रकारची घटना घडली आहे. या राज्याच्या माल्दा जिल्ह्यात दोन आदीवासी महिलांना अर्धनग्न करुन जमावाकडून त्यांची धिंड काढण्यात आली. या महिला चोरी करतात असा जमावाचा संशय होता. यातून हा प्रकार घडल्याचे प्रतिपादन करण्यात येत आहे.
या प्रकरणी माल्दा पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे. या घटनेचा व्हिडीओही प्रसारित झाल्याने संतापाची लाट देशभर उमटली आहे. राजकीय पक्षही या दोन्ही घटनांसंबंधात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असल्याने त्यांना राजकीय रंग मिळाल्याचे दिसून येत आहे. देशभरात अशा महिला विरोधी घटनांची संख्या वाढत असून विविध राज्यांमध्ये अशा घटना घडत आहेत.
अद्याप तक्रार नाही
माल्दा जिल्ह्यात घडलेल्या या प्रसंगाची तक्रार अद्याप संबंधित पोलिस स्थानकात सादर करण्यात आलेली नाही. मात्र, पोलिसांनी स्वत:च तपास सुरु केला असून पाच संशयितांना अटक केल्याची माहिती दिली आहे. या घटनेचा व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतरच आम्हाला याची माहिती मिळाली असा दावा माल्दा पोलीसांनी केला. नंतर त्वरित कारवाईला प्रारंभ झाला. संशयितांची चौकशी सुरु असून या प्रकारामागची खरी कारणे लवकरच समोर येतील. कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही, असा निर्धार पोलिसांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
पाकूहाट येथील घटना
काही दिवसांपूर्वीच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. त्या होत असताना मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. त्यात 50 हून अधिक माणसे दगावली. तसेच महिलांवर अत्याचारही मोठ्या प्रमाणात झाले असा आरोप झाला. भाजपच्या एका कार्यकर्तीची विवस्त्र करुन धिंड काढण्यात आल्याची तक्रार गुरुवारीच सादर करण्यात आलेली आहे. त्यापाठोपाठ आता हे आदीवासी महिलांवरील अत्याचारांचे प्रकरण बाहेर आले आहे. महिलांना मारहाण करण्यात आल्याचे या व्हिडीओंमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे, असे तज्ञांचे मत आहे.









