बरीच जुळी मुले अगदी एकमेकांसारखी दिसतात ही बाब सर्वश्रुत आहे. पण एका शाळेत एक नव्हे, दोन नव्हे तर 76 मुले अगदी एकमेकांसारखीं दिसणारी आहेत, अशी माहिती मिळाल्यास आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. पंजाब राज्यातील जालंदर जिल्ह्याच्या पोलीस स्कूलमधली हवी सत्यपरिस्थिती आहे. या शाळेत 600 हून अधिक विद्यार्थी आहेत. त्यातील 76 विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये दिसण्याचे अतिशय साम्य आहे. ही सर्व मुले जुळ्यांपैकी नाहीत. पण त्यांच्यातील काही मुले एकमेकांची नातेवाईक आहेत. एका शाळेत एकाच वेळी अशी समसमान दिसणारी मुले इतक्या संख्येने असणे एक आश्चर्य मानले जात आहे.
कित्येकदा त्यांच्या शिक्षकांची त्यांना ओळखण्यात चूक होते. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याने केलेल्या चुकीची शिक्षा त्याच्यासारख्या दिसणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्याला भोगावी लागते. या शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी विज यांनी आपल्या शाळेचे नाव यामुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये नोंदविण्यासाठी आवेदनपत्र दिले आहे. आता या विद्यार्थ्यांना एकमेकांपासून वेगळे ओळखण्यासाठी वेगळ्या रंगांचे रुमाल देण्यात आलेले आहेत. शाळेचा गणवेश सर्व विद्यार्थ्यांसाठी समान असल्याने जेव्हा हे विद्यार्थी-विद्यार्थिनी गणवेश परिधान करुन शाळेत येतात, त्यावेळी तर त्यांना ओळखणे अतिशय अवघड बनते. काही चलाख विद्यार्थी-विद्यार्थिनी याचा लाभ उठविल्याशिवायही रहात नाहीत. अर्थात, असे करणे हे बालसुलभ मनोवृत्तीचे प्रतीक असल्याने शिक्षक त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, ही शाळा आता तिच्या या वैशिष्ट्यामुळे राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे. असे कसे घडले, याला काहीही उत्तर नाही. कारण दिसणे कोणाच्या हातात असत नाही. हा केवळ एक अभिनव आणि आश्चर्यकारक योगायोगच म्हणावा लागेल, असे अनेकांचे मत आहे.