सुभाष देशमुखे,कराड
Karad Crime News : शुक्रवार 21 जुलै 2023 रोजी कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालाने समाजमनाला उभारी मिळाली. समाजातील अपप्रवृत्तीला धडकी बसेल, असा हा निकाल राज्यभर चर्चेत आला. अवघ्या आठ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्दयीपणे खून करत 70 फूट खोल दरीत मृतदेह फेकून देणाऱ्या आरोपीस शुक्रवारी विशेष न्यायाधीशांनी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. 29 डिसेंबर 2021 या दिवशी वाल्मिक पठाराच्या परिसरात घडलेल्या घटनेचा अवघ्या 19 महिन्यांत जलदगती निकाल लागला. या निकालाने उमलणाऱ्या निरागस कळ्यांकडे कुप्रवृत्तीने पाहणारांना निश्चित पायबंद बसेल,अशी प्रतिक्रिया उमटली.
आपण केलेल्या कृत्याबद्दल आपणास फाशीची शिक्षा सुनावली जात आहे’…. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या या शिक्षेने 30 डिसेंबर 2021 रोजीचा चीड आणणारा घटनाक्रम ढेबेवाडी खोऱयातील प्रत्येकाच्या डोळय़ासमोर तरळला. या घटनाक्रमाने 19 महिन्यांपूर्वीच्या त्या प्रुर आठवणींना उजाळा मिळत माताभगिनींचे डोळे ओले झाले. आठ वर्षांची ‘ती’ चिमुकली तिच्या मैत्रिणीसमवेत नराधमाच्या अंगणात खेळत होती. दोन दिवस अगोदरच तिच्यावर डोळा ठेवून असलेल्या नराधमाच्या कृत्याला 29 डिसेंबरच्या दुपारी चार वाजता आक्रितपणे संधी मिळाली.
चॉकलेटचे अमिष दाखवून गळा घोटला
‘ती’ खेळत असतानाच तिची मैत्रिण घरचे हाक मारत आहेत म्हणून गेली.आठ वर्षांची ‘ती’ आता एकटीच आपल्या विश्वात रमली होती. हाच डाव साधत तिला नराधमाने चॉकलेटचे अमिष दाखवत वाल्मिक पठाराच्या परिसरात निर्जनस्थळी नेले. ‘ती’ प्रतिकार करत होती, मात्र तो तिच्या आयुष्यावर उठला होता. त्याने ‘तिच्या’वर अत्याचार करत तिचा गळा घोटला. सायंकाळी चार ते साडेचार या अवघ्या अर्ध्या तासात त्याने तिला संपवत तब्बल 70 फूट दरीत निर्दयीपणे फेकून दिले. तिच्या आर्त किंकाळ्यांनी डोंगरदऱ्यालाही हेलावल्या असतील. आठ वर्षांचे तिचे आयुष्य एका वासनेने अवघ्या अर्ध्या तासात संपवले होते.
आरोपीला गाफिल ठेवत पोलिसांचा तपास
आपल्या घरची खेळकर, सर्वांची लाडकी, अभ्यासात हुशार ‘ती’ अंधार पडला तरी का आली नाही? या विचारात कुटुंबासह शेजारीपाजारी तिच्या शोधात गावासह डोंगरदऱ्यात हाका मारत धावत होते. गडद अंधारात शोध घेणाऱ्यांना तिच्या आयुष्यात कायमचा अंधार झाल्याची पुसटशी जाणिव नव्हती. तिच्या आयुष्यात ज्याने हा अंधार पसरवला तो सुद्धा तिला शोधण्याचे विदारक नाटक करत होता. ग्रामस्थांचे प्रसंगावधान आणि पोलिसांचा चलाखपणाने हे नाटक अवघ्या चार तासात उघडे पडले. गावात बिबट्यांचा वावर वाढला होता. त्याचा वावर लक्षात यावा, यासाठी साहिल नावाच्या इसमाच्या घरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. या कॅमेऱयात 29 तारखेला दुपारी चार वाजता नराधम आठ वर्षांच्या चिमुकलीस घेऊन जाताना दिसला होता. पण पोलिसांनी याचा अंदाज लागू न देता त्याच्या हालचालींवर पाळत ठेवत त्याला पुराव्यांसह ताब्यात घेतले.
दोषारोपपत्र दाखल…साक्षीदारही ठाम
तिचा अत्याचार करून प्रुरपणे खून झाल्याचे समोर येताच समाजमन पुरते आक्रमक झाले. तात्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी तपासात जीव ओतून काम करत नराधमास बेडय़ा ठोकल्या. कारण सीसीटीव्ही फुटेज, तिला शेवटचे नराधमासमवेत पाहिलेल्या दोन महिला साक्षीदार हे महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांना मिळाले. या महत्त्वाच्या पुराव्यांवरच सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांनी विशेष अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. के. होरे यांच्यासमोर युक्तिवाद केला.
सरकारी वकीलही हेलावले
घटनाक्रम सांगताना सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांचा आवाज एका क्षणी हेलावला. तिला जेव्हा नराधमाने निर्जनस्थळी नेले, तेव्हा ‘ती’ आठ वर्षांची चिमुकली प्रतिकार करत नराधमाच्या डोक्याचे केस ओढत होती. तिच्या मृत्यूनंतर शवविच्छेदनात तिच्या नखांत नराधमाच्या डोक्याच्या केसांचे अवशेष सापडले. राजेंद्र शहा या वाक्यानंतर थोडेसे थांबले…फॉरेन्सिक एक्सपर्टने या केसांच्या आधारावर केस आणखी प्रबळ केली. या सर्वांच्या मदतीने सरकारी वकील आणि सहकारी वकिलांनी युक्तिवाद केला. अखेर गळा घोटून दरीत फेकून दिलेल्या निरागसतेला मृत्यूनंतर का होईना 19 महिन्यांनी न्याय मिळाला.









