kolhapur Heavy Rain : पुढील तीन दिवस भारतीय हवामान खात्याने कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे.या कालावधीत 100 मिली मिटरपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातील जवळपास 70 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.सद्यास्थितीला सर्वच तालुक्यांमध्ये सर्व दूर पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ झालेली आहे. असाच पाऊस पुढील दोन ते तीन दिवस सुरु राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्या मार्गावरून पाणी वाहते आहे त्या मार्गाचा वाहतुकीसाठी अजिबात वापर करू नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती प्राधिकरण मार्फत करण्यात आले आहे. त्याचबरोबर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, जिल्हा प्रशासनामार्फत दिलेल्या सूचनांकडे लक्ष द्या आणि त्यांचे पालन करा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीही जिल्ह्यातील सर्व नागरिकांनाही केलेले आहे.
सध्या पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाणीपातळी 36 फुटांवर असून, इशारा पातळी गाढण्यासाठी तीन फूट बाकी आहे. जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोर असाच राहणार असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंचगंगेची इशारा पातळी गाठताच नागरीकांना स्थलांतर करावे लागेल अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
या पार्श्वभूमीवरती कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हा प्रशासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व सूचनांचे पालन करावे. कोणत्याही स्थितीमध्ये ज्या मार्गावरून पाणी वाहते त्या मार्गाचा वाहतुकीसाठी अजिबात वापर करू नये. आपल्या सोबत आपल्याबरोबरच्या लोकांच्या जीविताची काळजी घ्यावी.वर्षा सहलीच्या ठिकाण पाऊस मोठ्या प्रमाणात होत असल्याने याठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे. जिल्ह्यात कुठेही आपल्या आजूबाजूला आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते असे वाटलं तर आपण 1077 या टोल फ्री क्रमांक वरती संपर्क साधू शकता. मदतीची आवश्यकता असेल तर आपण मदतीची मागणी करू शकता,असेही सांगण्यात आले आहे.









