ग्रामस्थांचे तहसीलदारांना मागणीचे निवेदन
खानापूर : गणेबैल येथील ज्ञानेश्वर पारायण मंडळातर्फे ज्ञानेश्वर मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिराचे 2018 पासून स्वयंम घोषित अध्यक्ष लक्ष्मण कल्लाप्पा गुरव हे मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन पहात आहेत. मात्र त्यांनी गेल्या 5 वर्षाचा कोणताही आर्थिक हिशोब दिलेला नाही. अथवा बैठकही घेतली नाही. मंदिरात आर्थिक गैरव्यवहार झाला असून याची सखोल चौकशी करण्यात यावी, असे निवेदन तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्याकडे ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आले आहे. मंदिराचे बांधकाम गेल्या 20 वर्षापूर्वी सुरू करण्यात आले होते. मात्र आर्थिक निधीसाठी हे काम थांबलेले होते. आर्थिक नियोजनानुसार या मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. या मंदिरासाठी आमदार निधीतून तसेच दानशूर व्यक्तींच्या देणगीतून गणेबैल येथील भक्तांनी विट, वाळू तसेच कार्यकर्त्यांनी श्रमदानातून हे मंदिर उभारले आहे. मंदिरात दरवर्षी ज्ञानेश्वरी पारायण, महाप्रसाद तसेच रोजची पूजा, एकादशीनिमित्त भजन, कीर्तन यासह इतर धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येते.
मंदिराला कुलूप लावल्याने भाविकांची गैरसोय
कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात देणग्या देतात. 2018 साली लक्ष्मण कल्लाप्पा गुरव यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांना घेऊन व्यवस्थापन मंडळ तयार करून आपणच अध्यक्ष घोषित करून या मंदिराचा कारभार पहात आहेत. मंदिर शासकीय यादीत नोंद केल्याचे ते सांगत आहेत. मात्र याबाबतची कागदपत्रे दाखवण्यास तयार नाहीत. गेल्या पाच वर्षाचा हिशोब अथवा वार्षिक अहवाल त्यांनी एकदाही दिला नाही. तसेच बैठकही घेण्यास नाकार देतात. तसेच मंदिराला कुलूप घालून मंदिर बंद अवस्थेत ठेवतात. एकादशीच्या यात्रेनंतर ममदा कार्यक्रमासाठी ग्रामस्थ व वारकरी एकत्र जमले असता मंदिराला कुलूप लावून जात राहिले.
मंदिराच्या गैरव्यवहाराची चौकशी करा
खानापूर पोलीस निरीक्षकाना याबाबत कल्पना देवून मंदिराचे कुलूप तोडून ममदा कार्यक्रम पार पाडण्यात आला आहे. मंदिरात लग्न सोहळ्यासह इतर वैयक्तिक कार्यक्रमही केले जातात. त्यासाठी भाडेही आकारले जाते. याचाही हिशोब गावकऱ्यांना देण्यात आला नाही. यासाठी तहसीलदारांनी अथवा संबंधित खात्याने या ज्ञानेश्वर मंदिराच्या आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे.
कारवाई करण्याचे तहसीलदारांचे आश्वासन
निवेदनावर सतिश गुरव, ज्ञानेश्वर गेजपतकर, संदीप गुरव, मल्हारी गुरव, जोतिबा गुरव, जोतिबा चौगुले, सातेरी गुरव, केदारी गुरव, उदय जाधव, जोतिबा चौगुले, नवनाथ गुरव, प्रल्हाद गुरव, बाळू गेजपतकर यासह इतर ग्रामस्थांच्या सह्या आहेत. तहसीलदार गायकवाड यांनी निवेदनाचा स्वीकार करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.









