4 ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याची सूचना
वृत्तसंस्था / वाराणसी
वाराणसीतील प्रसिद्ध ज्ञानवापी परिसराचे शास्त्रीय पद्धतीने सर्वेक्षण करण्यात यावे, असा आदेश तेथील कनिष्ठ न्यायालयाने भारतीय पुरातत्व विभागाला दिला आहे. असे सर्वेक्षण करण्यात येऊ नये, अशी मागणी करणारी याचिका मुस्लीम पक्षकारांनी सादर केली होती. ती न्यायालयाने फेटाळली आहे.
या संपूर्ण परिसराचे शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात यावे. मात्र, हातपाय धुण्याच्या तलावाचा वादग्रस्त भाग वगळण्यात यावा. कारण तेथे सर्वेक्षण न करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. तेव्हढा भाग वगळून ऊर्वरित संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण करुन अहवाल 4 ऑगस्टपर्यंत सादर करावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
हा निर्णायक क्षण
न्यायालयाच्या या निर्णयावर हिंदू पक्षकारांनी आनंद व्यक्त केला आहे. हिंदू पक्षकारांचे विधीज्ञ सुभाष नंदन चतुर्वेदी यांनी या निर्णयाची माहिती पत्रकारांना दिली. हा या संपूर्ण प्रकरणातील सर्वात निर्णायक क्षण आहे. या शास्त्रीय सर्वेक्षणातून या परिसराच्या इतिहासाचे सत्य उलगडणार आहे. अनेक सहस्त्र वर्षांपासून हा परिसर हिंदूंचे पवित्र तीर्थस्थान आहे. मात्र. मुस्लीम आक्रमकांनीं अनेकदा या परिसराची नासधूस केली आहे, असे प्रतिपादन हिंदू पक्षकारांचे आहे.
गेल्या वर्षी व्हिडिओ सर्वेक्षण
गेल्या वर्षी या परिसराचे न्यायालयाच्याच आदेशावरुन व्हिडिओ सर्वेक्षण करण्यात आले होते. नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले होते. परिसरामध्ये असलेल्या तलावात प्राचीन शिवलिंग आहे, असे हिंदू पक्षकारांचे म्हणणे आहे. या शिवलिंगाचे कार्बन डेटिंग करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली होती. पण कार्बन डेटिंगच्या प्रक्रियेत शिवलिंगाची हानी होण्याची शक्यता गृहित धरुन सर्वोच्च न्यायालयाने अद्याप ही अनुमती दिलेली नाही. तसेच कार्बन डेटिंगऐवजी पर्यायी मार्गाने सत्य शोधता येईल का, अशी विचारणा केली आहे. त्यामुळे कनिष्ठ न्यायालयाने हा भाग वगळून इतर संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण करण्याचा आदेश आता दिला आहे. लवकरच ही प्रक्रिया प्रारंभ होत आहे.









