जयंत चौधरींच्या वक्तव्यामुळे चर्चेला वेग
वृत्तसंस्था/ लखनौ
राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष आणि खासदार जयंत चौधरी यांच्या एका वक्तव्याने उत्तरप्रदेशातील राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे. भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद लवकरच संसदेत असतील असे चौधरी यांनी म्हटले आहे. चंद्रशेखर आझाद हे सप-रालोद आघाडीत रालोदच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचा कयास आता वर्तविला जात आहे. रालोदच्या तिकिटावर चंद्रशेखर हे सहारनपूर मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात.
पश्चिम उत्तरप्रदेशातील अनेक जागांवर रालोदचा प्रभाव आहे. परंतु अद्याप सप-रालोद आघाडीत जागावाटप झालेले नाही. लोकसभा निवडणुकीत रालोदला किती जागा मिळतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जयंत चौधरी हे रालोआत सामील होऊन समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना झटका देऊ शकतात अशी चर्चा सुरू होती. परंतु विरोधी पक्षांच्या बैठकीत सामील होऊन चौधरी यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.









