हेरगिरीच्या संशयाखाली एसएसबीची कारवाई
वृत्तसंस्था/ किशनगंज
भारत-नेपाळच्या पानीटंकी सीमेवरून एसएसबीच्या जवानांनी अवैध मार्गाने भारतात प्रवेश करणाऱ्या एका चिनी नागरिकाला अटक केली आहे. या चिनी नागरिकाकडून भारतीय तसेच नेपाळी चलन हस्तगत करण्यात आले आहे. हा चिनी नागरिक 39 वर्षांचा असून त्याचे नाव पेंग योंगजिन असल्याचे सांगण्यात आले. चीनच्या शांहेई, विहाई पेंग येथील तो रहिवासी आहे. एसएसबीच्या नियमित तपासणीदरम्यान चिनी नागरिकाला रोखण्यात आले होते. या चिनी नागरिकाने नेपाळी पासपोर्ट अन् नागरिकत्व ओळखपत्र दाखविले होते. त्याने सादर केलेले पासपोर्ट बनावट असल्याचे समजल्यावर त्याला अटक करण्यात आली आहे.
एसएसबीच्या चौकशीत आरोपीला नेपाळी भाषा अवगत नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्याची झडती घेण्यात आली. यात चिनी सामग्री अन् एक ओळखपत्र सापडले. या ओळखपत्रावर पेंग योगजिन असे नाव नमूद होते. अधिक कसून चौकशी केली असता चिनी नागरिकाने नेपाळच्या अधिकाऱ्याला लाच देऊन नेपाळी पासपोर्ट मिळविला असल्याची कबुली दिली.









