चीन कधीच जुन्या मित्रांना विसरत नसल्याची टिप्पणी
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीन आणि अमेरिकेतील तणावादरम्यान अमेरिकेचे माजी विदेशमंत्री 100 वर्षीय हेन्री किसिंजर यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेतली आहे. किसिंजर यांनीच्या 1970 च्या दशकात चीनसोबतच्या अमेरिकेच्या संबंधांना घनिष्ठ स्वरुप प्राप्त करून दिले होते. किसिंजर यांचा आताचा दौरा हा वैयक्तिक स्वरुपाचा असून ते अमेरिकेचे प्रतिनिधी म्हणून चीनमध्ये गेले नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
किसिंजर यांची प्रतिष्ठा पाहता दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यास ते महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. अलिकडेच अमेरिकेच्या विदेशमंत्री जेनेट येलेन चीनच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. क्षी जिनपिंग यांनी येलेट यांची भेट घेणे टाळले होते. तर कुठल्याच पदावर नसलेल्या किसिंजर यांची भेट घेत त्यांचे स्वागत जिनपिंग यांनी केले आहे.
चीन चांगला मित्र
चीनचे लोक कधीच स्वत:च्या जुन्या मित्रांना विसरत नाहीत. अमेरिका आणि चीनचे संबंध नेहमीच हेन्री किसिंजर यांच्या नावाने आठवणीत राहणार आहेत. आम्ही योग्य मार्ग अनुसरून अमेरिकेसोबतचे संबंध सुधारण्यास तयार आहोत असेही जिनिपंग यांनी किसिंजर यांच्या भेटीनंतर म्हटले आहे. अमेरिका आणि चीनचे संबंध जागतिक शांतता आणि प्रगतीसाठी महत्त्वाचे आहेत असे किसिंजर यांनी नमूद केले आहे. चीनने किसिंजर यांना एक लीजेंड्री डिप्लोमॅट ठरविले आहे. तत्पूर्वी किसिंजर यांनी चीनचे वरिष्ठ मुत्सद्दी वांग यी आणि संरक्षणमंत्री ली शांगफू यांची भेट घेतली होती. किसिंजर यांनी आतार्पंत चीनचे 100 हून अधिक दौरे केले आहेत.
किसिंजर यांचे महत्त्व
1971 मध्ये चीन अन् अमेरिका यांच्यात कुठलेच अधिकृत राजनयिक संबंध नसताना किसिंजर यांनी चीनचा गुप्त दौरा केला होता. चीनचे अध्यक्ष माओ आणि अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यात बैठक घडवून आणण्यासाठी त्यांनी हा दौरा केला होता. 1972 मध्ये माओ आणि निक्सन यांच्यातील चर्चेनंतर दोन्ही देशांमधील संबंधांना सुरुवात झाली होती. व्हिएतनाम आणि कोरियात परस्परांच्या विरोधात युद्ध लढलेल्या अमेरिका आणि चीनसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा होता. 1970 मध्ये किसिंजर हे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते.









