कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची मुंबई येथे अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक पदी बदली झाल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर उपमुख्यमंत्र्यांचे सहसचिव संतोष सी पाटील यांची कोल्हापूर जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. शासनाकडून शुक्रवारी बदली आदेश निगर्मित केले. पाटील हे मुळचे बार्शी तालुक्यातील उंडेगाव येथील आहेत.
मितभाषी अधिकारी म्हणून नूतन सीईओ पाटील यांची ओळख
नूतन सीईओ संतोष पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील उडेगाव येथील आहेत. प्रशासकीय अधिकारी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह सचिव पदावर कर्तव्य बजावलेल्या पाटील यांची काही महिन्यांपूर्वी बढतीने ‘आयएएस’ केडरमध्ये निवड झाली. अत्यंत कार्यक्षम, मितभाषी अधिकारी अशी त्यांची प्रतिमा आहे. अप्पर जिल्हाधिकारी (गट-अ) संवर्गातील पाटील हे उडेगाव येथील रहिवासी आहेत. त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून दोन वर्षे काम केले. कोणत्याही वादात न पडता कोरोना महामारीच्या काळात त्यांनी वाखाण्याजोगी कामगिरी केली. १९९६ साली राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवल्यानंतर पाटील यवतमाळला उपजिल्हाधिकारी, पांढरकवडा येथे प्रांत अकोल्याला उपजिल्हाधिकारी रोहयो, नांदेड एमआयडीसी येथे प्रादेशिक अधिकारी म्हणून काम केले. पाटील यांना डिसेंबर २०२० रोजी राज्य सरकारने बढती दिली. त्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेत अप्पर आयुक्त, पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त (सामान्य) या पदावर काम केले आहे.
चव्हाण यांच्या कार्यकाळात उत्कृष्ठ कामकाज
मावळते सीईओ संजयसिंह चव्हाण यांनी सीईओ आणि प्रशासक पदाचा कार्यभार सांभाळताना अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवून कोल्हापूर जि.प. चे राज्यासह देशात नावलौकीक केले. जि.प.चा महा आवास अभियान २०२०-२१ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ४६५ बहुमजली इमारत बांधण्यात आल्या आहेत. त्यानुसार महाआवास अभियानामध्ये कोल्हापूर जि.प.ला राज्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच या योजनेअंतर्गत सन २०२१ – २२ मध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल पुणे विभागात जिल्ह्यातील पाच पंचायत समित्या अव्वल ठरल्या. केंद्र शासनामार्फत दिला जाणारा पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार २०२२ साठी कोल्हापूर जिल्हा परिषदेने सर्वसाधारण गटात राबविलेले उपक्रम व विविध निकषामध्ये केलेल्या कामकाजामुळे राज्यामध्ये कोल्हापूर जि.प. अव्वल ठरली. संपूर्ण महाराष्ट्रातून एकमेव कोल्हापूर जिल्हा गोल्ड सब नॅशनल सर्टीफीकेशन – २०२२ साठी नामांकन झाले. यशवंत पंचायत राज अभियान २०२२ – २३ मध्ये पुणे विभागामध्ये पडताळणी नंतर कोल्हापूर जि.प. अचल ठरली असून लवकरच राज्यस्तरीय समितीकडून पडताळणी होणार आहे. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२२ – २३ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यास राज्यात व्दितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. एएसईच्या अहवालामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. प्राथमिक शाळेच्या इयत्ता ५ वी व ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर जिल्हा राज्यात आघाडीवर आला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासह दिव्यांग योजनांना बळकटी देण्याचे काम चव्हाण यांनी केले.