वैद्यकीय जगतात होत असलेल्या नव्या बदलांमुळे आगामी काही वर्षांमध्ये उपचाराच्या पद्धती बदलणार आहेत. ब्रिटन आणि जपानचे वैज्ञानिक नॅनो रोबोट तयार करत आहेत. हे रोबोट शरीराच्या आत तैनात केले जातील. त्यांच्याकडून आजार शोधण्यासह उपचार देखील केले जाणार आहेत.
ब्रिटनच्या लीड्स युनिव्हर्सिटीत रोबोटिक्स विभागात प्राध्यापक असलेले पिएत्रो वाल्डास्ट्री यांनी 20 वेगवेगळे नॅनो रोबोट तयार केले असून यात कॅमेरे आणि सेंसर लावण्यात आले आहेत. काही नॅनो रोबोटमध्ये रेडिओ ट्रान्समीटर आणि रिसिव्हर देखील आहे. याच्या मदतीने सर्जनना शरीराच्या आत काय होतेय हे पाहता येणार आहे. तसेच सर्जन या रोबोट्सना आदेश देऊ शकतील.
हे कॅप्सूल रोबोट इतके लहान आहेत की ते गिळता येणार आहेत. पुढील महिन्यात प्राध्यापक वाल्डास्ट्री यांच्याकडून डिझाइन करण्यात आलेल्या एका रोबोटचे पहिल्यांदाच मानवावर परीक्षण होणार आहे.

वेदनामुक्त उपचार
या रोबोटला कोलोनोस्कोपीला वेदनामुक्त निवारण करण्याच्या उद्देशाने डिझाइन करण्यात आले आहे. कोलोनोस्कोपीमध्ये तपासणीसाठी कॅमेऱ्यासोबत एक ट्यूब कोलनमध्ये टाकली जाते. एका कोलोनोस्कोपीमध्ये 45 मिनिटांचा कालावधी लागतो आणि रुग्णाला बेशुद्ध करावे लागते. ब्रिटनमध्ये दरवर्षी सुमारे 9 लाख कोलोनोस्कोपी केल्या जातात. कोलोनोस्कोपी वेदनादायी आहे. तर कॅप्सूल रोबोट हा आकाराने लहान असल्याने याच्या मदतीने वेदनारहित उपचार होईल आणि रुग्णाला बेशुद्ध करावे लागणार नसल्याचे प्राध्यापक वाल्डास्ट्री यांनी म्हटले आहे.

रोबोटचे शरीरातील भ्रमण
रोबोटच्या मदतीने कोलनच्या अधिक हिस्स्यांना पाहण्यास आम्ही सक्षम होऊ जेणेकरून कुठलीच चूक मागे राहू नये. नॅनो रोबोटचे डिझाइन तयार करण्यास 15 वर्षे लागली आहेत असे प्राध्यापक वाल्डास्ट्री यांच्याकडून सांगण्यात आले. रोबोट दर सेकंदाला शरीरात 150 वेळा फेऱ्या मारू शकतो. जवळपास 6 फूट उंचीच्या माणसाने 643 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने प्रवास करण्याइतका हा वेग असल्याची माहिती डॉक्टर शील्ड्स यांनी दिली आहे.
उंदरांवरील परीक्षण यशस्वी
वैज्ञानिकांनी उंदरांच्या मूत्राशयात स्टेरॉयड डेक्सामेथासोनद्वारे पूर्वीच लोड करण्यात आलेले हजारो मायक्रोरोबोट तैनात केले आहेत. मूत्राशयात स्वत:ची जागा निर्माण करण्यास हे मायक्रोरोबोट यशस्वी ठरले होते. तसेच त्यांच्याकडून औषधे पोहोचवून प्रतिरक्षा पेशींना यशस्वीपणे सक्रीय करण्यात आले होते.









