2030 पर्यंत उद्दिष्ट साकारण्याचा अमिताभ कांत यांचा दावा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र आणि राज्य सरकारे देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर देत आहेत. 2030 पर्यंत सर्व दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचे विद्युतीकरण करण्याचे केंद्राचे उद्दिष्ट आहे. जेणेकरून कार्बन उत्सर्जन कमी करता येईल आणि डिझेल-पेट्रोलवरील अवलंबित्व कमी करता येईल असे निती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांनी सांगितले.
देशाने 2030 पर्यंत दुचाकी आणि तीन चाकी वाहने 100 टक्के इलेक्ट्रिक बनविण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे. तसेच भारताने 2030 पर्यंत 65 टक्के राज्य सार्वजनिक वाहतूक इलेक्ट्रिक बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे. इलेक्ट्रिक मोबिलिटीची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भारताला स्पष्ट धोरणात्मक पायाभूत सुविधांची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
2030 पर्यंत 100 टक्के इलेक्ट्रिक दुचाकी
2030 पर्यंत 100 टक्के इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीन चाकी वाहने बनवायची आहेत, असे भारताचे धोरण असले पाहिजे. काही झालं तरी ध्येय निश्चित करा आणि त्या दिशेने काम करा.
जागतिक स्तरावर इलेक्ट्रिक कारच्या बाजारपेठेने 10 दशलक्षचा टप्पा ओलांडला आहे आणि विकल्या गेलेल्या नवीन कारपैकी 18 टक्के इलेक्ट्रिक आहेत, ते म्हणाले की चीनमध्ये 60 टक्के कार इलेक्ट्रिक आणि युरोपमध्ये 15 टक्के, अमेरिकेत 10 टक्के प्रमाण आहे. अमिताभ कांत यांनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी कमी किमतीत वित्तपुरवठा करण्याची सूचना केली. इलेक्ट्रिक वाहनांचे पुनर्विक्री मूल्य कमी असल्याने आर्थिक कर्ज देणाऱ्या संस्था आणि बँकांसमोर आव्हान आहे.









