दमदार पावसाने शहरासह ग्रामीण भागाला झोडपले, नदी, नाले प्रवाहीत, गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 12 मी.मी. पावसाची नोंद, जलाशयांच्या पाणीसाठ्यात वाढ
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून गुरूवारी तर शहरासह ग्रामीण भागाला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. धुवांधार पावसामुळे साऱ्यांचीच तारांबळ उडाली. या पावसामुळे पहिल्यांदाच शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचून होते. गटारी तुडुंब भरून वाहत होत्या तर काही गटारींमधील पाणी रस्त्यांवर आले होते. यामुळे पादचाऱ्यांनाही ये-जा करणे कसरतीचे ठरत होते.
मान्सूनचे आगमन उशीराने झाले. त्यानंतर दमदार पाऊस देखील कोसळण्यास बराच कलावधी लागला. जुलै महिना मध्यावधी आल्यानंतर यावर्षी दमदार पावसाला सुरूवात झाल्याने साऱ्यांनाच सुखद धक्का मिळाला आहे. बुधवारीही पावसाने चांगली साथ दिली. त्यानंतर गुरूवारीही धुवाधार पाऊस कोसळला. त्यामुळे नदी, नाले, पाण्याने प्रवाहीत झाले. याचबराब्sार जलाशयांमध्येही पाण्याचा साठा होवू लागला आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होण्यास मदत झाली आहे. या पावसामुळे सर्वच पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील जनजीवन विस्कळीत
गुऊवारी झालेल्या दमदार पावसामुळे शहरातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले होते. पावसामुळे फेरीवाले, बैठे व्यापारी यांची तारांबळ उडाली. खरेदीदारांनाही पावसात भिजतच खरेदी करावी लागत होती. शहरातील काही भागांतील गटारींमध्ये कचरा अडकल्याने पाणी वाहत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. एकूणच पावसाने दमदार सुरुवात केल्यामुळे दिलासा मिळाला आहे. पावसामुळे त्रास झाला तरी पाणी समस्या मिटणार असल्याने साऱ्यांनीच समाधान व्यक्त केले.
दमदार पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचून होते. रस्ते खराब झालेल्या ठिकाणी खडी उखडली होती. त्यामध्ये पाणी साचल्यामुळे वाहने चालविणे कसरतीचे ठरत होते. दमदार पावसामुळे साऱ्यांनाच रेनकोट आणि छत्रीचा आधार घ्यावा लागला होता. विद्यार्थ्यांनाही शाळेला जाताना त्रास सहन करावा लागला होता. यावर्षी पाऊस लांबल्यामुळे साऱ्यांच्याच नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. मात्र आता पावसामुळे दिलासा मिळाला आहे.
तालुक्यामध्ये 21 मी.मी. पावसाची नोंद
जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांत 12 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर तालुक्यामध्ये 21 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यामध्ये सरासरी ही 11 मी.मी.ची होती. मात्र 10 मी. मी. अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच अधिक पावसाची नोंद झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. यापूर्वी 1 जुलै ते 20 जुलै पर्यंत 138 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये 11 मी.मी. पावसाची अधिक नोंद झाल्याचे सांगण्यात आले.
जलाशयांच्या पाणीसाठ्यात वाढ
पावसामुळे राकसकोप, हिडकल, हिप्परगी, अलमट्टी, नवलतीर्थ या जलाशयांमध्ये पाणीसाठा वाढू लागला आहे. जलाशयांमध्ये मोठ्या प्रमाणात नदी व नाल्यांतून पाणी जमा होत असून मात्र पूर्ण भरण्यासाठी अजूनही दमदार पावसाची गरज असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. घटप्रभा, हिरण्यकेशी, कृष्णा, मलप्रभा, दूधगंगा, वेदगंगा या नद्यां दुथड्या भऊन वाहू लागल्या आहेत. आणखी काही दिवस असाच दमदार पाऊस झाला तर जलाशये भरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
भात लागवडीला पोषक
तालुक्यातील विविध गावांमध्ये भात लावणी करण्याकडेच शेतकरी भर देतात. त्या शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फायदा झाला आहे. आता चिखल करणे सोपे जाणार आहे. सध्या पाऊस झाला असला तरी चिखल करण्यासाठी अजूनही दमदार पावसाची गरज असल्याचे शेतकऱ्यांतून सांगण्यात येत आहे. पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी आहे.
टोमॅटो पिकाला पुन्हा फटका
बटाटा तसेच इतर पिकांनाही हा पाऊस पोषक ठरला आहे. मात्र भाजीपाला व टोमॅटो पिकाला पुन्हा फटका बसल्याचे सांगण्यात आले. टोमॅटोचा दर वाढला आहे. मात्र या पावसामुळे त्या पिकांना फटका बसल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या टोमॅटोचा दर गगनाला भिडला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आशेत होते. मात्र पावसामुळे टोमॅटो पीक पुन्हा खराब होण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त करण्यात येत आहे.









