गोकाक-आंबोलीला धावणार बसेस : पर्यटकांच्या सोयीखातर निर्णय
प्रतिनिधी / बेळगाव
पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी गोकाक फॉल्सला विशेष बसची सुविधा देण्यात आली आहे. दि. 22 जुलै ते 27 ऑगस्टपर्यंत ही बससेवा उपलब्ध होणार आहे. महिन्यातील दुसरा आणि चौथा शनिवार व दर रविवारी आणि शासकीय सुटीच्या दिवशी ही बससेवा मध्यवर्ती बसस्थानकातून सकाळी 9 वा. गोकाक आणि आंबोलीला धावणार आहे. हिडकल डॅम, गोडचिनमलकी, गोकाक फॉल्स या पर्यटनस्थळांना भेट देऊन पुन्हा सायंकाळी माघारी फिरणार आहे.
मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे नदी, नाले आणि तलावांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मार्कंडेय, घटप्रभा नद्यांच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे धबधबे प्रवाहीत होऊ लागले आहेत. गोडचिनमलकी आणि गोकाक धबधबादेखील प्रवाहीत झाला आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. दरम्यान प्रवाशांच्या सोयीखातर मध्यवर्ती बसस्थानकातून गोकाकसाठी विशेष बसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
आंबोली धबधब्यासाठीदेखील विशेष बसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना बसने प्रवास करून धबधब्याचा आनंद लुटता येणार आहे. विशेषत: शक्ती योजनेंतर्गत मोफत प्रवास करता येणार आहे. त्यामुळे यंदा वर्षापर्यटनाच्या विशेष बससेवेला प्रतिसाद वाढेल, अशी आशा परिवहनला आहे. प्रवासी बसस्थानकात किंवा www.ख्srtम्.ग्ह या वेबसाईटवर ऑनलाईन तिकीट बुक करू शकतात. अधिक माहितीसाठी 7760991612 किंवा 7760991625 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे परिवहनने आवाहन केले आहे.
गोकाकसाठी तिकीट दर 190 रुपये
मध्यवर्ती बसस्थानकातून सकाळी 9 वाजता गोकाक धबधब्याकडे बस धावणार आहे. सकाळी 10 वा. हिडकल डॅम, 11.30 वा. गोडचिनमलकी, 1.30 वा. गोकाक फॉल्स, पुन्हा सायंकाळी 6.00 वा. माघारी परतणार आहे. यासाठी तिकीटचा दर 190 रुपये आहे.









