शेअर बाजार गेल्या 5 वर्षात सातत्याने वाढ दर्शवत असून मार्च 2023 मध्ये 57,500 असणारा सेन्सेक्स आता 65,700 च्या पुढे आहे! सेन्सेक्स ही भारताच्या शेअर बाजाराची एकूण स्थिती व्यक्त करण्याची पद्धत मुख्यत्वे 30 महत्त्वाच्या शेअर्सवर आधारीत असून भारतातच नव्हे तर जगभर त्याचा वापर होतो. याच्या जोडीला राष्ट्रीय सूचकांक निफ्टी हा 50 शेअर्सवर आधारीत असून तोही 19490 चा टप्पा गाठत आहे. शेअर बाजार गेल्या 3 महिन्यात 11 टक्क्याने वाढला असून आता जागतिक क्रमवारीत अमेरिका, चीन व जपाननंतर सर्वात मोठा आहे. शेअर बाजारात व म्युचलफंडातून गुंतवणूक असणाऱ्यांचे परतावे दोन अंकी वाढ दर्शवत असून हे अच्छे दिन सातत्याने चालणार का? अद्याप पुढे वाढ किती व घसरणीची शक्यता किती असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. भारतीय शेअर बाजाराचे मूल्य आता 3.5 लाख कोटी पार केले असून आगामी 3 ते 4 वर्षात सेन्सेक्स लाखाचा टप्पा पार करणार असे आशावादी चित्र अनेक तज्ञ मांडतात. सेन्सेक्सच्या या कामगिरीचे गुपीत व भविष्य समजून घेताना प्रथम हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, युरोपियन बाजारपेठ, अमेरिका यांच्या अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली असून अमेरिकन डॉलर गुंतवणुकीच्या दृष्टीने दुबळा वाढत असल्याने विदेशी गुंतवणूक संस्था (इघ्घ्-इदाग्gह घ्हूग्tल्tग्दहत् घ्हनूल्rs) व देशांतर्गत गुंतवणूक संस्था (अऊ-असूग्म् घ्हूग्tल्tग्दहत् घ्हनूल्rs) यांनी भारतीय बाजाराकडे आपला गुंतवणुकीचा ओघ वळवला असून परिणामी एका आठवड्यात निफ्टी व सेन्सेक्स 2.4 टक्क्यांनी वाढले. यामध्ये बँकींग क्षेत्रानेही भर घातली व बँक निफ्टीने 43,233 ची मजल गाठली. विदेशी गुंतवणूकदारांना भारतीय बाजारपेठ अधिक परतावा देणारी वाटते, याचे महत्त्वाचे कारण अर्थव्यवस्थेत असणारी उत्पन्न वाढीची क्षमता हे आहे. वाढती व मोठी लोकसंख्या, वाढते उत्पन्न, मध्यमवर्गीयांचे वाढते उत्पन्न व खर्च वृत्ती याचा परिणाम कंपन्यांची सकारात्मक किंवा फायदेशीर कामगिरीतून व्यक्त होते. आयसीआयसीआय, अॅक्सिस बँक, बजाज ऑटो, मारुती, नेस्ले या प्रतिनिधीक कंपन्यांकडे पाहिल्यास हे स्पष्ट होते. गुंतवणुकीचा चमकता तारा असे जागतिक स्तरावर भारताबद्दल नाणेनिधीने मत व्यक्त केले असून गतवर्षी 50 अब्ज डॉलर्स इतकी विदेशी गुंतवणूक भारतात झाली असून ती जगात तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक आहे. भारतीय हवाई क्षेत्राचा विकास हे वाढत्या उत्पन्नपातळीचे दर्शक असून इंडिगो कंपनीने 500 विमाने खरेदी करण्याचे ठरवले असून ही सर्वात मोठी विमानखरेदी ऐतिहासिक उच्चांक आहे. रशिया व चीन या मोठ्या अर्थव्यवस्था जागतिक विकासात आता मोठे योगदान देऊ शकत नाहीत हे स्पष्ट झाल्याने विकासक्षमता, गुंतवणूक सुरक्षितता व वर्धिष्णू परतावा भारतीय बाजारात दिसत असल्याने गुंतवणुकीचा लोंढा भारताकडे वळला आहे. याचे प्रतिबिंब शेअर निर्देशांकात दिसते. 1982 मध्ये सुरू झालेला शेअरबाजार निर्देशांक सेन्सेक्स अनेक धक्के पचवत 1992 मध्ये 4500 तर 1999मध्ये 5000 व 2008 मध्ये 8200 असा वाढत 2007 मध्ये 20,000, 2021 मध्ये 50,000 तर सप्टें. 2021 मध्ये 60,000 झाला व जुलै 7, 2023 मध्ये 65,785 चा उच्चांक गाठला. असे असले तरी मंजिले और भी है…! हे महावास्तव विसरता कामा नये!
घसरण शक्यता?
शेअर बाजार नेहमी चढउताराचाच असतो. शेअर बाजारातील तेजी एका टप्प्यानंतर फायदा वसुली सुरू झाली की घसरण सुरू होते. तांत्रिक दृष्टीने अंदाज व्यक्त करणारे निफ्टी 19000 नंतर घसरण दर्शवेल, असे म्हटले होते. प्रत्यक्षात हा टप्पा बराच मागे पडला असून बाजाराने आगेकूच चालूच ठेवली आहे. जागतिक स्तरावर इतरत्र गुंतवणूक संधी वाढल्या तर गुंतवणूक ओघ बदलू शकतो. परंतु ही शक्यता नजिकच्या भविष्यकाळात फार कमी दिसते. आपला शेअर बाजार आता किंमत नफा गुणोत्तराच्या स्वरुपात 70 टक्के असून हेच प्रमाण अमेरिका व अन्यत्र 10 टक्के आहे. यावरून भारतीय कंपन्यांचे मूल्यांकन आकर्षक नाही. तथापि वृद्धीची खात्रीशीर संभाव्यता व नफा विस्तार या निकषांवर भारतीय बाजार महत्त्वाचा ठरतो. पंतप्रधानांचा अलीकडील अमेरिकन दौरा व त्यातून संरक्षण, व्यापार, तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक करार ही बाब स्पष्ट करतात. गुंतवणूकदारांचे आयपीओमार्फत गतवर्षी 19 अब्ज डॉलर्स कंपन्यांकडे आले, यातून गुंतवणूकदारांचा विश्वास व्यक्त होतो. उत्तम कंपन्यांचा आयपीओ 107 पट भरणा होतो ही आपल्या बाजाराची सक्षमता स्पष्ट करते. बाजाराची सकारात्मक दिशा ही एकदिशा नसते. त्यात घसरण ही नव्याने गुंतवणुकीस आकर्षण ठरते. त्यामुळे घसरणीच्या भयाने बाजार सोडण्याचा प्रयत्न छोट्या गुंतवणूकदारांनी न करता घसरण झाल्यास गुंतवणूक वाढीचे धोरण ठेवणे आवश्यक ठरते. पार्टी की अभी सुरुवात है! हे विसरु नये पण येणारी घसरण ही शेअर बाजाराची नियमितता असते हे लक्षात घ्यावे. शेअर बाजारात सध्या वेगवान आणि बळकट असा गुंतवणूक ओघ वाढण्याची ‘वेब’ सिरीज किंवा गुंतवणूक मालिका सुरू असून अर्थव्यवस्था सुदृढ होत असल्याचे ते दर्शक आहे.
गुंतवणूक भय मानसिकता
शेअर बाजाराबाबत असणारी भय मानसिकता त्यातील मोठ्या चढउतारातून निर्माण होते हे जसे सत्य आहे तसेच अर्थ निरक्षरता व वित्तीय नियोजनाची दुर्लक्षित बाजू देखील जबाबदार आहे. बदलत्या तंत्र प्रगतीचा सर्वाधिक वापर वित्तक्षेत्रात होत असून अत्यंत सोप्या, सुरक्षित पद्धतीने गुंतवणूक करणे शक्य झाले आहे. यातून दरमहा शिस्तबद्ध गुंतवणूक (एसआयपी) करणारे वाढत असल्याने भारतीय शेअर बाजाराचे विदेशी गुंतवणुकीचे परावलंबन घटत आहे. ही गुंतवणूक रचना पुढील दशकात अधिक गतिमान होईल. अद्यापि भारतीय गुंतवणूकदार 50 टक्के मालमत्ता घरे, जमीन अशा स्वरुपात तर 15 टक्के मुदत ठेव, 15 टक्के सोने आणि 10 टक्के विमा क्षेत्रात गुंतवत असल्याचे आर्थिक पाहणीतून (2023) दिसून आले आहे. आपल्या मालमत्ता सुरक्षितता, तरलता व परतावा या निकषावर तपासणे महत्त्वाचे असून भाववाढीपेक्षा अधिक परतावा देणाऱ्या गुंतवणुकीचा चांगला पर्याय शेअर बाजार ठरतो. भारतीय शेअर बाजाराने गेल्या पाच दशकात 16.8 टक्के परतावा (वार्षिक) दिला असून त्याचा फायदा फक्त 6 टक्के लोकच घेत आहेत. याचे कारण शेअर बाजारात पैसे बुडतात, तो जुगार आहे ही गुंतवणूक भय मानसिकता आहे. ही अकारण भीती सोडून वित्तीय क्षेत्रातील प्रगतीत सहभागी झाल्यास ‘सब का साथ, सब का विकास’ साध्य होईल.
– प्रा.विजय ककडे








