25 जुलैला पुढील कार्यकक्षेत प्रवेश
वृत्तसंस्था /बेंगळूर
चांद्रयान-3 हळूहळू चंद्राच्या जवळ येत आहे. ‘चांद्रयान-3’ने तिसऱ्या कक्षेतून गुरुवारी चौथ्या कक्षेत प्रवेश केल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) दिली. यापूर्वी मंगळवारी, 18 जुलै रोजी चांद्रयान-3 ने तिसऱ्या कक्षेत प्रवेश केला होता. आता 25 जुलै रोजी चांद्रयान पुढील कक्षेत प्रवेश करणार असल्याचेही इस्रोकडून सांगण्यात आले. सध्या ‘चांद्रयान-3’ पृथ्वीपासून हजारो किमी अंतरावर असलेल्या लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे. या मोहिमेतील पूर्वनियोजनानुसार पृथ्वीभोवती पाचवेळा भ्रमंती केल्यानंतर ‘चांद्रयान-3’ चंद्राच्या दिशेने झेप घेणार आहे. सध्या चौथ्या कार्यकक्षेत असलेल्या यानाची फिरण्याची क्षमता आणि व्याप्ती हळूहळू वाढवली जात आहे. चांद्रयान-3 चे प्रक्षेपण 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता करण्यात आले होते. यानाची आतापर्यंतची वाटचाल नियोजनबद्धरित्या सुरू असून पुढील यशस्वी टप्प्यानंतर 23 ऑगस्ट रोजी ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची शक्मयता आहे. ही भारताची तिसरी चांद्रमोहीम असून त्याअंतर्गत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘चांद्रयान-3’ यशस्वीपणे उतरवण्याची भारताची योजना आहे. जर भारत यात यशस्वी झाला तर भारत असे करणारा जगातील चौथा देश बनेल. आतापर्यंत फक्त अमेरिका, रशिया आणि चीननेच ही कामगिरी केली आहे.









