संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉग्रेससह विरोधी पक्षांनी मणिपूर येथे झालेल्या घटनेचा निषेध करून निदर्शने केली. मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केल्यानंतर दुपारी संसदेची दोन्ही सभागृहे दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली. विऱोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमध्ये त्यांनी ‘सभागृात येऊन चर्चा करा’ असे पंतप्रधानांना आव्हान केले.
मणिपूरमधील कुकी- झोमी समुदायातील दोन महिलांची पुरुषांच्या एका जमावाने नग्न अवस्थेत फेरी काढली. या घटनेचा व्हिडिओ काल दिवसभर सोशल मीडियावर फिरू लागल्यानंतर आज सुरु झालेल्या पावसाळी अधिवेशन विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला.
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सरकार संसदेच्या दोन्ही सभागृहात मणिपूरवर चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “मणिपूर मध्ये जो काही प्रकार घडला तो निंदनिय आहे…मणिपूरबाबत चर्चेच्या विरोधकांच्या मागणीबाबत हे स्पष्ट करायचे आहे की मणिपूरबाबत दोन्ही सभागृहात चर्चा करण्यास सरकार तयार आहे. पक्षाचे उपनेते राजनाथ सिंह यांनीही या संदर्भात स्पष्टीकरण केले आहे.” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी, “मणिपूरमधील हिंसा हा एक संवेदनशील मुद्दा आहे. त्यामुळे सरकारला चर्चा करायची आहे. त्याप्रमाणे गृहमंत्री चर्चेला सविस्तर उत्तर देतील. म्हणूनच आम्ही सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालू देण्याची विनंती करत आहोत. अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर व्हायची आहेत. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा व्हायची आहे” असेही ते जोशी म्हणाले.









