सातत्याने गाव अंधारात; उपोषणाचा इशारा
दोडामार्ग – प्रतिनिधी
केर – भेकुर्ली हे दोडामार्ग तालुक्यातील शेवटच्या टोकाचे गाव असून येथील भाग जंगलव्याप्त आहे. विद्युत वाहिन्यांना लगडलेली झाडी मे महिन्यात साफ करावी अशी मागणी सातत्याने करूनही याकडे लक्ष न दिल्याने सध्या गेल्या चार दिवसापासून केर – भेकुर्ली परिसर अंधारात आहे. त्यामुळे जर येत्या आठ दिवसांत विद्युत वाहिन्या झाडीमुक्त न झाल्यास कोणत्याही क्षणी उपोषण छेडण्याचा इशारा केर – भेकुर्ली ग्रामस्थांच्यावतीने उपसरपंच तेजस तुकाराम देसाई यांनी दिला आहे.
केर – भेकुर्ली गावातील ग्रामस्थ नेहमी वीज वितरणला सहकार्य करत असतात. सद्यस्थितीत केर – भेकुर्लीत अंधार आहे. सदर वायरमन पोल खाली जाऊ शकत नाही तेवढी झाडीगच्च परिस्थिती आहे. यापूर्वी मे महिन्यात विद्युत पोल बदलताना कामगार जाऊ शकले नव्हते त्याचवेळी लाईन सफाई करण्याची मागणी केली होती मात्र ती पूर्ण न झाल्याने आता पावासाळ्यात गावामध्ये अंधार होत आहे. त्यामुळे तातडीने लाईन सफाई काम हाती घ्यावे आणि वीज ग्राहक तथा ग्रामस्थ यांची गैरसोय दूर करावी अशी मागणीही श्री. तेजस देसाई यांनी केली आहे.









