पगारवाढीची प्रमुख मागणी झाली मान्य
पणजी : पगारवाढीसह अन्य विविध मागण्यांसाठी राज्यातील बालरथ कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप बुधवारी मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या ठोस आश्वासनानंतर मागे घेण्यात आला. आता या कर्मचाऱ्यांपैकी चालकास 17 हजार तर वाहकास 10 हजार ऊपये पगार मिळणार आहे. त्याशिवाय विधानसभा अधिवेशनानंतर होणाऱ्या खास बैठकीत त्यांच्या अन्य मागण्या मंजूर करण्यात येणार आहेत, अशी माहिती युनायटेड बालरथ संघटनेच्या नेत्या स्वाती केरकर यांनी दिली आहे. विधानसभा अधिवेशनच्या पूर्वसंध्येला सोमवारपासून या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. गेल्या कित्येक वर्षांपासून हे कर्मचारी केवळ 5500 ते 11 हजार एवढ्या तुटपुंज्या पगारात काम करत होते. त्यामुळे संसाराचा गाडा हाकताना त्यांची प्रचंड ओढाताण होत होती. त्यामुळे चालकास किमान 20 हजार आणि वाहकास 14, 500 ऊपये पगार देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती.
राज्यात सुमारे 840 बालरथ कर्मचारी असून आपल्या विविध मागण्यांसाठी यापूर्वी अनेकदा त्यांनी धरणे, निदर्शने, संपही केले होते. मंगळवारी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांचा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी त्यांना 1000 आणि 500 ऊपये पगारवाढ देण्याचे जाहीर केले होते. परंतु ती मागणी धुडकावून लावत त्यांनी संप चालूच ठेवला होता. त्यानंतर काल बुधवारी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या संघटनेशी बोलणी केली व वाढीव पगार देण्याचे मान्य केले, अशी माहिती केरकर यांनी दिली. त्याशिवाय या कर्मचाऱ्यांना जून 2023 महिन्यापासून वार्षिक 5 टक्के पगारवाढ देण्यात येणार आहे. तसेच यापूर्वी केवळ दहा महिन्यांचाच पगार देण्यात येत होता, तोही आता बारामाही मिळणार असून तो थेट बँक खात्याच्या माध्यमातून (डीबीटी) देण्यात येणार आहे. तसेच चालकाचा विमा, कायमस्वऊपी नोकरीची हमीही त्यांना देण्यात आली आहे. चालकाचा विमा उतरविण्यात आल्यामुळे त्याच्या कुटुंबियांसही सुरक्षा कवच मिळणार आहे.
आजपासून सुरू होणार बालरथ
दरम्यान, आजपासून सर्व कर्मचारी कामावर ऊजू होणार आहेत. गत तीन दिवसात बालरथ न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले होते. यासंबंधी संघटनेने सर्वांना पूर्वकल्पना दिली होती, तरीही सर्वच पालकांना मुलांसाठी वाहतुकीची पर्यायी व्यवस्था करणे शक्य झाले नव्हते. परिणामी काही मुलांना शाळेत जाताही आले नव्हते. आजपासून हा प्रश्न सुटणार आहे.









