साखळीत पंपींग प्रक्रियेला प्रारंभ : दिवसभर पावसाने झोडपले. झाडांची पडझड सुरूच
डिचोली : अपेक्षाप्रमाणे काल बुध. दि. 19 जुलै रोजीही दमदार पावसाने डिचोली तालुक्याला झोडपून काढले. मंगळवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे सकाळी साखळीतील वाळवंटी व डिचोलीतील नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. वाळवंटी नदीने साडेतीन मीटरची पातळी गाठल्याने बाजारात साचणारे पाणी पंपिंगद्वारे बाहेर फेकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मध्यरात्रीनंतर पंप सुरू करून ही प्रक्रिया हाती घेण्यात आली. तसेच डिचोलीतील नदीचीही पातळी बरीच वाढले होती. त्यामुळे जलस्त्राsत खात्याचे अभियंते व कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
पावसाबद्दल वेधशाळेने दिलेल्या सतर्कतेच्या इश्रायानंतर सर्व पातळीवरून जोरदार पावसाची व त्यामुळे निर्माण होण्राया घटना व समस्या याबाबत सतर्कता बाळगण्यात आली आहे. मंगळवारी दिवसभर तसेच रात्रभर ही पावसाने जोरदार वृष्टी केली घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पावसाने वृष्टी केल्याने दोन्हीही नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले. या नद्या दुथड्या भरून वाहू लागल्याने नद्याच्या बाजूला असलेले सर्व नाले व उपनद्या यामध्येही बरेच पाणी साचले होते. परिसरातील संपूर्ण भाग जलमय झाल्याने तलावाचे स्वरूप आले होते. साखळीतील वाळवंटी या नदीने मंगळवारी मध्यरात्री साडेतीन मीटरची पातळी गाठली होती. तर आतील नाल्यांमध्ये 3.40 मीटर इतके पाणी साचले होते. नदीतील पाणी आत येऊ नये म्हणून या नाल्यातील गेट्स बंद करण्यात आल्या. व बाजारातील नाल्यात असणारे पाणी पंपिंग करून पुन्हा नदीत सोडण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली. रात्रभर ही प्रक्रिया चालूच होती तर सकाळी साडेआठ वाजल्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला व नदीतील पातळीही किंचित घटली त्यानंतर पंपिंग प्रक्रिया बंद करण्यात आली होती.
साखळीत 15 तासांत 7 इंच पावसाची नोंद
दिवसभर पावसाचा मारा चालूच होता. परंतू वाळवंटी नदीच्या पातळीत तशी मोठी वाढ न झाल्याने पुन्हा पंपिंग करण्याची गरज पडली नाही. साखळी परिसरात मंगळवारी संध्याकाळी 5.30 ते बुधवारी सकाळी 8 या पंधरा तासात सात इंच पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर दिवसभर पाऊस चालूच होता.
डिचोलीतील नदीलाही पाणी वाढले
साखळीतील वाळवंटी प्रमाणेच डिचोली येथील नदीलाही पाणी बरेच वाढले होते. तळेखोल महाराष्ट्र व इतर भागांमध्ये पडलेल्या जोरदार पावसामुळे या नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. या नदीची पातळी मंगळवारी मध्यरात्रीनंतर तीन मीटरच्या वर गेली होती. परंतु पूरस्थिती नियंत्रणात होती. जलस्रोत खात्याचे अभियंते व कर्मचारी डिचोलीतील परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. नदीला पाणी भरून राहिल्याने लामगाव येथून येण्राया नाल्यात दिवसभर पाणी साचून राहिले होते. त्यामुळे या भागाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
हरवळेत भीमतीर्थ धबधब्याचे भयानक स्वरूप
हरवळे साखळी येथील श्री ऊद्रेश्वर देवाच्या समोर उंचावरून कोसळणारा भीमतीर्थ हा धबधबा भयानक स्वरूप घेऊन वाहत होता. मुसळधार पावसामुळे जी नदी या धबधब्यात विसर्जित होते त्या नदीला उधाण आले होते. त्यामुळे हा धबधबा दिसायला अगदी भयानक दिसत होता. या धबधब्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने पैलतीरी असलेल्या जैन मंदिराकडे जाण्यासाठी असलेला लोखंडी पूल पाण्याखाली गेला होता. सदर पुलवरून जाता येत नव्हते.